“सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.” :- रवि वसंत सोनार
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
“ आपले सणवार आणि रीतीरिवाज जपत असताना आपण आपल्या परिचयातील अधिकाधिक परिचितांना आपल्या आनंदात सहभागी करून घेण्याचा संकल्प केला पाहिजे. आणि त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते त्यांच्या जन्मवर्ष सुवर्णमहोत्सवाच्या औचित्याने संकल्पित कला, क्रीडा, आरोग्य, साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक आदी विभागातील उपक्रमांतर्गत सौ. सविता रवि सोनार यांच्या वतीने तिळगूळ व संक्रांत वाण स्नेहभेट या सांस्कृतिक उपक्रमावेळी बोलत होते. सोनार दांपत्यांकडून गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील सर्वच स्त्री पुरुष ज्येष्ठांसाठी औषध गोळ्या ठेवण्यासाठी उपयुक्त असे प्लास्टिकचे चौकोनी डबे संक्रांत वाण स्नेहभेट देण्याच्या सांस्कृतिक उपक्रमात पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले - “संक्रांत सणाच्या निमित्ताने स्नेहभेट स्वरुपात देण्यात येणारे वाण देताना उपयुक्ततेचा विचार केल्यास सणाचा आनंद निश्चितच द्विगुणित होईल.”
या उपक्रमासाठी उपस्थित असणारे श्री उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मा. राजेंद्र सुर्यवंशी म्हणाले की - “ ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण देणं लागतो हा भाव मनात आणून कृतीत आणण्याचे काम कवी रवि सोनार सातत्याने करीत आहेत.” तर सामाजिक कार्यकर्ते मा. तुकाराम खंदाडे म्हणाले की “ कवी रवि सोनार यांनी गरज ओळखून दिलेली मदत ही सत्कारणी लागते.” यावेळी मातोश्री वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक श्री राक्षे “कवी सोनार यांचे सामाजिक कार्य हे वेगळ्या पद्धतीने असून ते नेहमीच वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना सहकार्य करीत असतात.”
संक्रांत सणाच्या निमित्ताने आयोजित सदर उपक्रमासाठी श्री व सौ सुधीर साळुंखे हे मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कु. रेवती सोनार आणि चि. ओंकार सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले. सोनार परिवाराच्या या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांतून आनंद व कौतुक केले जात आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा