“शालेय विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होणे अत्यावश्यक.” - रवि वसंत सोनार
शिवशाही वृत्तसेवा पंढरपूर (हुसेन मुलाणी)
“शालेय जीवनात सर्व विद्यार्थ्यांवर सुसंस्कार होणे अत्यावश्यक आहे.” असे मत येथील सामाजिक कार्यकर्ते व विश्वविक्रमवीर कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते येथील रुक्मिणी विद्यापीठ, पंढरपूर संचलित अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिर, इसबावी येथे प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना कवी रवि सोनार म्हणाले - “ शालेय मुलांवर सुसंस्कार झाल्यामुळे ते भविष्यात सुजाण व जबाबदार नागरिक म्हणून कार्यरत राहतील. आणि याचा सर्वांना निश्चितच फायदा होईल.”
यावेळी अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिर मधील विद्यार्थी व विद्यार्थीनींना कवी रवि सोनार आणि सौ. सविता रवि सोनार दांपत्यांनी स्वादिष्ट व रुचकर चॉकलेटचा खाऊ तर दिलाच शिवाय विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिर ग्रंथालयासाठी समूह गीत संग्रह, संस्कार गीत संग्रह, शालेय प्रार्थना संग्रह याचबरोबर देशभक्ती गीत संग्रह या पुस्तकांचे अक्षरऐवज संच स्नेहभेट स्वरुपात दिले.
रुक्मिणी विद्यापीठाच्या सचिव मा. सुनेत्राताई विजयसिंह पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अक्षरनंदन प्राथमिक विद्यामंदिर येथे भारतीय प्रजासत्ताक दिनी रुक्मिणी बॅंकेचे व्यवस्थापक मा. विनोद आदमिले, कवी रवि सोनार, सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविता रवि सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत सहशिक्षक मा. सुसेन गरड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी बोलताना मा. काशिनाथ गोगाव म्हणाले - “कवी रवि सोनार यांचेकडून स्नेहभेट स्वरुपात मिळालेली प्रार्थनेची, संस्कारांची पुस्तके वाचून विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना बौद्धिक लाभ होईल.”
या समारंभावेळी अक्षरनंदन विद्यामंदिरच्या सई माने, उमेरा खाटीक, पवन शेलार, भक्ती यादव, वरूण स्वामी, अन्वी गोळे, यश शिंदे, श्लोक मर्ढेकर या विद्यार्थ्यांनी भाषण, गीत गायन व नृत्य केले. ध्वजारोहण कार्यक्रमास अक्षरनंदन विद्यामंदिरचे सौ. राणी गावडे, सौ. रूपाली भुईटे, सौ. वृषाली स्वामी, मा. दिगंबर देवकर तसेच पालक वर्ग उपस्थित होते. भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सोनार दांपत्यांच्या अक्षरऐवज स्नेहभेट उपक्रमामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचारी वृंद यांच्याकडून कौतुक व आनंद व्यक्त केला जात आहे.
-------------------------------------------------------------------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा