न्याय मिळेपर्यंत डी.बी.एल. कंपनी ला काम करू देणार नाही ग्रामस्थांचा इशारा
मयत सुनील उर्फ पप्पू पाटील |
मंगळवेढा प्रतिनिधी राज सरवडे
दसरा सणानिमित्त पूजेसाठी फुले आणण्यासाठी निघालेल्या माजी उपसरपंच सुनील उर्फ पप्पू पाटील यांना डी.बी.एल. च्या क्रेनने धडक दिल्याने त्याखाली चिरडून पाटील यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता माचणूर चौकात घडली. यामध्ये आणखी एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेमुळे विजयादशमीच्या सणा दिवशीच ब्रह्मपुरी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान क्रेनचालक राम यादव (वय 37 रा. मध्य प्रदेश ) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ब्रह्मपुरी येथील माजी उपसरपंच सुनील उर्फ पप्पू पाटील (वय 45), व राजेंद्र दगडू पुजारी (वय 51), हे दोघे दसरा सणा निमित्त पूजेसाठी फुले आणण्यासाठी बेगमपूर येथे निघाले होते. यावेळी माचणूर चौकातून बेगमपूर कडे निघालेल्या क्रेनचाचा धक्का लागून दोघेही पडले. या वेळी अपघात झाल्याचे कळताच क्रेनचालक घाबरून पळून जात असताना, टायर डोक्यावरून गेल्याने, माजी उपसरपंच सुनील पाटील हे जागीच मयत झाले. यामध्ये गाडीच्या पाठीमागे बसलेले राजेंद्र पुजारी यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेने जमाव संतप्त झाला होता. सध्या रस्त्याच्या अर्धवट पुलांची कामे, आणि रस्त्याच्या कामानिमित्त, डी.बी.एल. कंपनीची वाहने, क्रेन, जेसीबी, इत्यादी ये-जा करत असतात. परंतु या चालकांकडून काळजीपूर्वक वाहने चालवली जात नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. क्रेन चालकाच्या बेफिकिरीने मुळे पप्पू पाटील यांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, आई-वडील, तीन विवाहित बहिणी, असा परिवार आहे. बेगमपूर इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक सुरेश पाटील, यांचे पप्पू पाटील हे चिरंजीव होते. तर या अपघातात जखमी झालेले, राजेंद्र पुजारी हे संत दामाजी साखर कारखान्यात, सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. दरम्यान पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूराव पिंगळे, सत्यजित आवटे, हे पुढील तपास करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन, त्यांनी ग्रामस्थांना दिले आहे
तर डी.बी.एल.कंपनीची वाहने पेटवून देऊ - ग्रामस्थ संतप्त
बीपीएल कंपनीच्या वाहनचालकांकडून बेफिकीरपणे वाहने चालवली जात आहेत. यापूर्वी सुद्धा तिघे जण मृत्युमुखी पडले आहेत. शुक्रवारी घडलेला अपघात हा क्रेन चालकाच्या निष्काळजीपणाने घडला आहे. यामुळे नागरिकांतून असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पाटील कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू देणार नाही. कामे सुरू केल्यास सर्व वाहने पेटवून देऊ असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा