काँग्रेसकडून रजनी पाटील आणि भाजपाकडून संजय उपाध्याय मैदानात
शिवशाही - वृत्तसेवा
हिंगोली येथील काँग्रेस नेते तथा राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली आहे. चार ऑक्टोबरला या जागेसाठी मतदान होणार असून, काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपाने देखील हि जागा लढवण्याची तयारी केली असून भाजपाचे संजय उपाध्याय हे रजनी पाटील यांना आव्हान देणार आहेत.
पाच राज्यातील सहा जागांसाठी होणार मतदान
निवडणूक आयोगाने पाच राज्यातील सहा रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, या संदर्भात १५ सप्टेंबर रोजी आदिसूचना जारी केली होती. २२ सप्टेंबर पर्यंत उमेदवारांनी आपले अर्ज दाखल करायचे होते, तर ४ ऑकटोबरला मतदान प्रक्रिया होणार आहे. पाच राज्यातील सहा जागांपैकी महाराष्ट्रातील राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेचा या प्रक्रियेत समावेश आहे.
खा. राजीव सातव यांचे मे महिन्यात निधन
काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे १६ मे रोजी निधन झाले. कोरोनाची झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यसभेची जागा रिक्त झाली होती. सातव यांच्या निधनावर हिंगोलीसह देशभर शोक व्यक्त झाला होता. राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव याना या जागेवर उमेदवारी मिळेल अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. काँग्रेसकडूनही तसे संकेत दिले गेले होते. मात्र काँग्रेसने रजनी पाटील यांना उमेदवारी दिली आहे.
कोण आहेत रजनी पाटील ?
रजनी पाटील या काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या असून सध्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मर्जीतल्या रजनी पाटील यापूर्वीही खासदार होत्या. सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीत रजनी पाटील यांचेही नाव आहे. परंतु राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. आता काँग्रेसने रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. दरम्यान राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेसकडून राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासह काँग्रेस नेते मुकुल वासनिक आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याही नावाचा विचार झाला होता. मात्र रजनी पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असून, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २२ सप्टेंबरला त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे.
भाजपा लढवणार जागा
राज्यसभेची हि जागा भाजपदेखील लढवणार असून पक्षाने रजनी पाटील यांच्या विरोधात संजय उपाध्याय यांना मैदानात उतरवले आहे. भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय उपाध्याय यांनीसुद्धा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २२ सप्टेंबरला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. संजय उपाध्याय हे मुंबई भाजपचे सरचिटणीस असून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांची उमेदवारी घोषित केली आहे.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा