स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त
कर्मयोगी महाविद्यालया मध्ये तीन दिवसीय “कर्मयोगी व्याख्यानमाला” संपन्न.
karmyogi sudhakarpant paricharak
पंढरपूर प्रतिनिधी
स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त कर्मयोगी अभियांत्रिकी व पॉलीटेक्निक महाविद्यालय शेळवे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.17 ते 19 ऑगस्ट दरम्यान आयोजित केलेली तीन दिवसीय आभासी “ कर्मयोगी व्याख्यानमाला” संपन्न झाली. यामध्ये प्रा. श्री लक्ष्मणराव ढोबळे, श्री विवेकजी घळसासी व ह.भ.प. श्री चैतन्य महाराज देगलूरकर या नामवंत वक्तांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली.स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रतिवर्षी अशा व्याख्यानमालेचे आयोजन करणार असल्याची माहिती श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक यांनी दिली. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सदर ची व्याख्यानमाला ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली.
या व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प 17 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध वक्ते प्रा. श्री. लक्ष्मणराव ढोबळे यांनी गुंफले. यामध्ये त्यांनी “मालकांचा कर्मयोग ” या विषयावर विचार मांडले. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांचे राजकीय प्रवासातील अनुभव कथन करून मालकांच्या निष्काम कर्मयोगा बद्दलच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
नामवंत वक्ते, पत्रकार व प्रबोधनकार श्री. विवेक जी घळसासी यांनी या व्याख्यानमालेचे द्वितीय पुष्प “युवक:समाज व संस्कृति” या विषयावर गुंफले. या व्याख्यानामध्ये त्यांनी युवकांचे समाजाप्रती असणारे योगदान व कर्तव्य या वर विस्तृत प्रबोधन केले. तसेच भारतीय संस्कृतीची श्रेष्ठता टिकविण्याचे आवाहन ही त्यांनी युवकांना केले. सद्यस्थितीला भरकटत चाललेल्या युवा पिढीला त्यांनी मार्गदर्शन करून त्यांनी समाजाबद्दल चा सध्याचा संकुचित दृष्टीकोन बदलून विश्वव्यापक समजाचा दृष्टीकोन अंगीकारावा असे आवाहन केले. युवकांमधील ताकद, जोश व वेळ इतरत्र वाया न घालविता समाजाच्या उन्नतीसाठी व देशाच्या प्रगतीसाठी याचा योग्य वापर करण्याचे आवाहन ही त्यांनी युवकांना केले. तसेच युवा शक्ति ही महान शक्ति असून युवकांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे याची जाणीव ही त्यांनी युवकांना करून दिली.
या व्याख्यानमालेचे अंतिम पुष्प 19 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध प्रवचनकार हभप श्री. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी “कर्मातील ज्ञानयोग” या विषयावर गुंफले. त्यांनी ज्ञान योग व कर्म योग यांचे विस्तृत व स्वतंत्र विवेचन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या निरपेक्ष समाजसेवेचे व कार्यपद्धतीचे अनेक पैलू उलगडून त्यांनी मोठया मालकांचा कर्मयोग विशद केला.
सदर च्या आभासी तीन दिवसीय व्याख्यानमालेसाठी श्रोतृवर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. तसेच सदर च्या व्याख्यानमालेसाठी माननीय आमदार श्री.प्रशांतजी परिचारक, श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, संस्थेचे अध्यक्ष श्री. दिलीप शहा, रजिस्ट्रार जी. डी. वाळके, उमा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक, कर्मयोगी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, उपप्राचार्य प्रा.जगदीश मुडेगावकर, कर्मयोगी पॉलीटेक्निक चे प्राचार्य डॉ. ए. बी. कणसे, कर्मयोगी अभियांत्रिकीचे संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. आशिष जोशी व इ. मान्यवर उपस्थित होते. सदर ची व्याख्यानमाला ऑनलाइन पद्धतीने झूम, यू ट्यूब व फेसबूक लाईव या पद्धतीने प्रसारित करण्यात आली. सदर ची व्याख्यानमाला ऑनलाइन प्रसारित करण्याचे काम प्रा दीपक भोसले यांनी पाहिले. या व्याख्यानमालेसाठी प्रा संदीप सावेकर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा