अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचा मेळाव्यात नानासाहेब जावळे-पाटील यांची गर्जना
![]() |
nanasaheb javale-patil |
जळगाव; प्रतिनिधी :
आरक्षणप्रश्नीमराठा समाज शांतपणे आंदोलन न करता हातात दांडूके घेवूनच आक्रमक पध्दतीने तीव्र आंदोलने करणार असल्याचे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनाचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी सांगितले. नानासाहेब जावळे-पाटील हे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचा मेळाव्यात बोलत होते.
![]() |
nanasaheb javale patil |
मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देवून गेलेले सरकार आणि सत्तेवर आलेले सरकार यांनी मराठा समाजाचा केवळ निवडणूकीपुरता वापर करून तोंडाला पाने पुसली आहेत. राज्य शासन केंद्राकडे तर केंद्र सरकार राज्याकडे असे एकमेकांकडे बोट दाखवत असून वेळ मारून नेत मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हात झटकले आहेत, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आतापर्यंत ५८ मूक मोर्चे अत्यंत शांत आणि संयमीपणाने काढले आहेत. परंतु, आता मराठा समाज शांतपणे आंदोलन न करता हातात दांडूके घेवूनच आक्रमक पध्दतीने तीव्र आंदोलन करणार असल्याचे अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनाचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी सांगितले
शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये शुक्रवारी (दि.१३) रोजी मराठा समाजाचे आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका घेण्यासाठी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेचा मेळावा घेण्यात आला. या दरम्यान झालेल्या परिषदेत ते बोलत होते.
जावळे पाटील म्हणाले, यापूर्वीच्या राज्य शासनकाळात अत्यंत शांततापूर्ण व संयमीपणाने मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले आहेत. मराठा समाजाला आरक्षणासह मराठी युवकांना शैक्षणिक सवलती देण्यात याव्यात या मागण्यांसह गत वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत.
कोरोना संसर्ग प्रादूर्भावामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्याने आर्थिक उत्पन्नाचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफी देण्यात यावी, आदी मागण्यांसाठी राज्यभर दौरे केले जात आहेत.
कोपर्डीच्या घटनेतील अत्याचारग्रस्त भगीनीला अजूनही न्याय मिळालेला नाही. मारेकर्यांना फाशीची शिक्षा झाली असली तरी, या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. २८ ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार्या बैठकीनंतर मंत्रालयावर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संयमपूर्वक मोर्चाऐवजी आता हातात दंडूके घेवूनच मोर्चा काढला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. फडणवीस सरकारच्या काळात आणि त्यानंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाज आरक्षणासाठी टोलवाटोलवी केली जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी ज्यांनी विरोध केला आहे त्यांचा आम्ही विरोध करत आहोत. याशिवाय त्यांना आगामी निवडणूकांच्या काळात पाडणारच असा निर्धार जावळे-पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी अ. भा. छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भिमराव मराठे, प्रा. आर. व्ही. पाटील, पंजाबराव काळे, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष नंदू पाटील, जिल्हाध्यक्ष संतोष पाटील, राजू कुमावत, महिला आघाडी अध्यक्षा वंदना पाटील, जिल्हाध्यक्षा रेखा पाटील, शहराध्यक्ष नाना पाटील, सुरेश पाटील, ऍड. सचिन पाटील, बापू पाटील, किशोर पाटील, केतन पाटील, मनोज मोहिते, ईश्वर पवार, राहूल पाटील, विजय पाटील, मराठा सेवा संघाचे राम पवार, मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते समाजबांधव उपस्थित होते.
#मराठाआरक्षण
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा