सर्वंकष साहित्य वाचनाने मनोबल व आत्मविश्वास वाढतो - रवि वसंत सोनार
![]() |
कविता सादर करताना कवी रवि वसंत सोनार |
पंढरपूर (प्रतिनिधी) :- ' कोरोना महामारीच्या कालावधीत जगातील प्रत्येक व्यक्ती एक प्रकारच्या भितीच्या सावटाखाली आहे. ज्याला त्याला कोरोना विषाणूची भिती वाटत असून अनेकांचे अर्थिक व मानसिक खच्चीकरण झाले आहे. परंतू या जागतिक महामारीच्या काळात आपण वेगवेगळ्या साहित्यिकांची मनोरंजनात्मक , प्रबोधनात्मक, वैचारिक व इतर विषयांवरील पुस्तके वाचल्यावर प्रत्येकाचे मनोबल व आत्मविश्वास वाढेल. ' असे मत सामाजिक कार्यकर्ते व कवी रवि वसंत सोनार यांनी व्यक्त केले. ते येथील लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था पंढरपूर 1 व 2 यांचे संयुक्त विद्यमाने महाकवी कालिदास दिवसाच्या औचित्याने आयोजित कविसंमेलनात बोलत होते. लोकमंगल समुहाच्या अनेक वर्षांपासूनच्या या साहित्यिक उपक्रमाबद्दल अभिनंदन करून धन्यवाद देऊन पुढे बोलताना कवी सोनार म्हणाले की ' आपल्यासाठी व आपल्या सुरक्षिततेसाठी शासनाच्या नियमानुसार आपण सर्वांनी शासनास सहकार्य करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.'
![]() |
कवी संमेलनात सहभागी कवी आणि संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी |
लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्थेच्या महाकवी कालिदास दिवसाच्या औचित्याने आयोजित कविसंमेलनात यावेळी कवी रवि सोनार यांच्यासह कवी सचिन कुलकर्णी, कवी गणेश गायकवाड तसेच कवयित्री आशाताई पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी कवी रवि सोनार यांनी पावसाळी वातावरणातील प्रेम कविता, कवी गणेश गायकवाड यांनी हलके फुलके विनोद करत ग्रामीण जीवनावर भाष्य करणाऱ्या कविता, कवी सचिन कुलकर्णी यांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पंढरीच्या वारीची वास्तवदर्शी कविता तर कवयित्री आशाताई पाटील यांनी वैचारिक कविता सादर केल्या.
कविसंमेलनासाठी उपस्थित कवी आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. तसेच सर्व कवी आणि कवयित्रींचा पुष्पहार, पुष्पगुच्छ व संस्थेचा वार्षिक अहवाल देऊन स्वागतपर सत्कार करण्यात आला. यावेळी सल्लागार श्री. अनंता चव्हाण, श्री. अजय जाधव, श्री. सदाशिव शेळके, श्री. शिवाजी चराटे , श्री. विजय शिंदे, श्री. समर्थ कोकाटे हे मान्यवर उपस्थित होते.
कोरोना बाबतचे नियम पाळत संपन्न झालेल्या या कविसंमेलनात सहभागी कवींनी सादर केलेल्या वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कवितांचा उपस्थित रसिक श्रोत्यांनी आस्वाद घेत टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला. यावेळी सर्व कर्मचारी वृंद ,खातेदार उपस्थित होते.शाखाधिकारी श्री. संतोष काळे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. तर शाखाधिकारी श्री. दिगंबर जाधव यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखेचे कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा