पंढरपुरात उभारले जाणार भारत भालके यांच्या नावे क्रीडा संकुल
मंगळवेढा-(प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार यांनी पंढरपुरात सर्व सोयीसुविधांनी युक्त सुसज्ज असे क्रीडा संकुल निर्माण करू, असा शब्द मतदारांना दिला होता.त्याबाबत आता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी पुढाकार घेतला असून, मंगळवारी मुंबई येथे त्यांनी क्रीडा मंत्री सुनील केदार यांची भेट घेत पंढरपुरात क्रीडासंकुल उभारणीबाबत सहकार्य करण्याबाबत चर्चा केल्यानंतर क्रीडामंत्री सुनील केदार यांनी तात्काळ सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना सूचना देत पंढरपुरातील क्रीडा संकुलाचा प्रस्ताव त्वरित सादर करावा,असे सांगितले. या क्रीडा संकुलाला दिवंगत आमदार भारत भालके यांचे नाव देण्यात येईल, असे आश्वासन केदार यांनी दिली.
भगीरथ भालके यांनी मतदार संघातील विविध प्रश्नांसाठी मुंबई येथे जयंत पाटील व इतर मंत्र्यांची भेट घेतली.यावेळी त्यांनी क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांना भेटू मतदारसंघातील क्रीडासंकुल याबाबत माहिती देत दिवंगत आमदार भारत भालके यांचे क्रीडा संकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मतदारसंघातील क्रीडाप्रेमींना न्याय देण्याची भूमिका घेत मदत करावी, अशी विनंती केली. पंढरपूर शहरात क्रीडाप्रेमींसाठी बॅडमिंटन हॉल, हॉकी, कुस्ती मॅट,ट्रॅक इत्यादी अनेक खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी शासकीय सुसज्ज क्रीडा संकुल उभारण्यात येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून या कामात भगीरथ भालके यांनी पुढाकार घेतला आहे. पंढरपूर क्रीडा संकुल चा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करावा,असे आदेश केदार यांनी सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दूरध्वनीवरून आदेश दिले.त्यामुळे पंढरपूर मतदारसंघातील क्रीडासंकुलात शिक्षण घेऊन राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर पंढरपूर -मंगळवेढातालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार जाण्यास मदत होऊन उत्तम खेळाडू निर्माण होतील, असेही ते म्हणाले.
-------------------------------------------------------------------------------------
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा