करमाळा परिसरात बिबट्याचा धुमाकूळ - नागरिकांत दहशत
![]() |
( संग्रहित चित्र ) |
- करमाळा तालुक्यात दहशत
- बिबट्याला ठार करण्याचे आदेश
- चार दिवसात सलग तिसरा बळी
करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याने सोमवारी आणखी एक बळी घेतला . सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास केडगाव शिवारात एका ऊसतोड कामगाराच्या ७ वर्षीय मुलीस बिबट्यांने ठार केले . फुलाबाई आरचंद कोटले (रा . दुसाने ,ता . साक्री ,जि . धुळे ) असे तिचे नाव आहे . दरम्यान चार दिवसात तिसरा बळी घेतल्याने करमाळा तालुक्यात प्रचंड दहशत पसरली आहे . या नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत .
याबाबतीत हकीकत अशी आहे की ,सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बळीराम तात्याबा बारकुंड (रा. चिखलठाण ) याच्या केडगाव हद्दीतील शेतात ऊसतोडणी सुरु होती . तर ज़िल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या केडगाव फाट्यावरील उसाचा फडात ऊसतोडणी कामगारांची मुले खेळत होती . अशातच नरभक्षक बिबट्याने अल्पवयीन मुलगी फुलाबाई हिच्यावर झडप घालून मान जबड्यात पकडली व तिला उसाच्या पिकात खेचून नेले . यावेळी फुलाबाई सोबत खेळणाऱ्या मुलांनी आरडाओरडा केल्याने हा प्रकार माहिती झाला . यावेळी तत्काळ ऊसतोड कामगारांनी कोयते घेऊन बिबट्याचा पाठलाग केला . ५० फूट अंतरावर बिबट्याने फुलाबाईला जबड्यातून खाली टाकले . कामगारांनी उसाच्या फडातून बिबट्याला हुसकावून लावले. जखमी मुलीला प्रथम स्थानिक दवाखान्यात व नंतर करमाळा येथील उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता , डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी करमाळा वन परिक्षेत्रात ४० ट्रॅप कॅमेरे, १५ पिंजरे, बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी ३ जणांचे पथक, श्वानपथक, ५ हत्यारी पोलीस, शस्त्रधारी वनरक्षक, व शार्पशुटर तैनात करण्यात आले आहेत. या बाबत ड्रोनची व्यवस्था करण्यात येत आहे.
यामुळे उघड्यावर रहिवासी करणाऱ्या ऊसतोड कामगारांमध्ये मात्र प्रचंड दहशत निर्माण झाली आहे . या घटनेची माहिती मृत मुलीचा मामा विनोद बकाराम गायकवाड (वय ३६, रा. रुणबाई, ता. साक्री, जि. धुळे ) यांनी करमाळा पोलिसात दिली आहे . करमाळा पोलिसांनी या बाबत अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक सुनिल जाधव व सिद्धेश्वर लोंढे हे तपास करीत आहेत . घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले . वरिष्ठ पोलीस निरिक्षशक श्रीमंत पाडुळे यांच्या नेतृत्वाखाली करमाळा पोलिसांचा स्टाफ व वनविभागाचे धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वाखाली वनाधिकारी व कर्मचारी हे तैनात करण्यात आले . घटनास्थळी सर्वत्र पोलिसांनी सापळा रचला असून संपूर्ण परिसर घेरलं आहे. उसात दडून बसलेल्या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली आहे.
बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्नकरमाळा तालुक्यात शिरलेल्या बिबट्याने ३ डिसेम्बरला कल्याण फुंदे , रा. लिंबेवाडी याना ठार केले, त्यानंतर ५ तारखेला, अंजनडोह येथील जयश्री शिंदे यांचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. सोमवार ,७ रोजी केडगाव येथे ऊसतोड मजुराची मुलगी फुलाबाई आरचंद कोटले हिला ठार केले होते. त्यामुळे वनविभाग व पोलिसांनी बिबट्याला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु केले असून, बिबट्या उसात असल्याचे लक्षात आल्याने या परिसरातील ऊस सायंकाळी ५ च्या सुमारास पेटूवून देण्यात आला आहे. याशिवाय ५ शूटरही बिबट्याला शोधात आहेत .