लोकनेता हरपला - राष्ट्रवादीचे पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघाचे आमदार - भारत भालके यांचे निधन
पंढरपूर - (बातमीदार) पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारत तुकाराम भालके यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. भारत भालके यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर कोरोना मुक्त होऊन, ते घरी परतले होते. परंतु मागच्या काही दिवसापासून त्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने , पुण्याच्या रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न करूनही, त्यांना यश आले नाही, आणि शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. पंढरपूर मंगळवेढा परिसरात या दुर्दैवी घटनेमुळे दुःखाची लाट उसळली आहे.
कै. भारत भालके |
भारत भालके हे पंढरपूर परिसरातील एक लोकप्रिय नेते होते. नाना या नावाने प्रसिद्ध असलेल्या या लोकनेत्याचा दांडगा जनसंपर्क होता. मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखत असत. गाव पातळीवरून त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम करत असताना, त्यांनी पंढरपूर तालुक्यात आपला चांगलाच राजकीय जम बसवला होता. भाषणाची ग्रामीण बोलीभाषा, आणि सर्वांशी मिळून मिसळून वागण्याची शैली, यामुळे ते कार्यकर्त्यांमध्ये चांगले लोकप्रिय होत गेले, आणि नाना तालुक्यातील एक मोठे नेते बनले.
![]() |
लोकनेता आमदार - भारत भालके |
2009 साली झालेल्या, विधानसभा निवडणुकीत त्यांनी, महाराष्ट्रातील एक मातब्बर नेते, आणि माजी उपमुख्यमंत्री, विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करून, प्रथम विधानसभेत प्रवेश केला. ही निवडणूक महाराष्ट्रात खूपच गाजली होती. कारण या निवडणुकीपूर्वी नानांनी जरी निवडणूक लढवली असली तरी भारत भालके हे नाव, पंढरपूर परिसर वगळता फारसे कुणाच्या ऐकिवात नव्हते. परंतु 2009 च्या विधानसभा निवडणुकीत, विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव करून नाना आमदार झाले, आणि रातोरात भारत भालके हे नाव महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले. त्यानंतरच्या 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत विजय मिळवत भारत भालके यांनी विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. आणि पंढरपूर मंगळवेढा मतदार संघावर आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध केले.
![]() |
आमदार - भारत भालके |
ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, आमदार भारत भालके यांना कोरोनाची लागण झाली होती काही दिवस उपचार घेतल्यानंतर ते, कोरोना मुक्त झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, आणि डॉक्टरांनी त्यांना दवाखान्यातून घरी सोडले होते. कोरोना मुक्त होउन आल्यानंतर, लढवय्या स्वभावाच्या नानांनी, लगेच सक्रियता दाखवत आपल्या कामाला सुरुवात केली होती. परंतु मागच्या चार पाच दिवसापासून, भालके यांना आफ्टर कोव्हिडचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्याच्या रुबी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. दोन दिवसापूर्वी, रूबी हॉलचे, डॉक्टर परवेज ग्रँड यांनी, भालके यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना वेंटीलेटर लावल्याचे सांगितले होते. भालके यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी, रुबी हॉस्पिटल मध्ये जाऊन, भारत भालके यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. तसेच त्यांच्यावर होत असलेल्या उपचारांची माहिती सुद्धा घेतली होती. परंतु दुर्दैवाने शुक्रवारी रात्री राष्ट्रवादीचे लोकप्रिय आमदार भारत भालके यांनी, रुग्णालयात उपचारादरम्यान, अखेरचा श्वास घेतला, आणि पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील असंख्य नाना प्रेमींवर अक्षरशा: दुःखाचा डोंगर कोसळला.
शनिवारी पंढरपुरात नानांच्या निधनाची बातमी वार्यासारखी पसरली. शनिवारी कै. भारत भालके यांचे पार्थिव पंढरपुरात आणले, आणि दुपारी त्यांच्यावर, त्यांच्या मूळ गावी, सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आपल्या लाडक्या लोकनेत्याच्या अंत्यदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा अक्षरशा: जनसागर उसळला होता.
भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी त्यांना मुखाग्नी दिला तेव्हा, भगीरथ दादा सह नानांच्या लाखो कार्यकर्त्यांनाही, अश्रू अनावर झाले होते