कार्तिकी एकादशी असून पंढरीत शुकशुकाट - संचार बंदीचा परिणाम
 |
Pandharpur Curfew 2020 |
पंढरपूर - (बातमीदार) सध्या जगभरात कोरोना चे संकट असल्याने बहुतांश ठिकाणी लॉक डाऊन चालू आहे .तसेच या आजाराच्या भीतीने अनेक ठिकाणी लोक बाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत. भारतातही अशीच परिस्थिती आहे. यावर्षीच्या मार्च महिन्यापासून भारतातही covid-19 प्रसार झाल्याने लॉकडाउन लागू केले होते. त्यादरम्यान बाजारपेठा, शाळा, कॉलेज, चित्रपटगृहे, याबरोबरच धार्मिक स्थळे सुद्धा बंद करण्यात आली होती.
महाराष्ट्रातही मार्च महिन्यापासून लॉक डाऊन चालू होते. परंतु गेल्या काही महिन्यापासून हळूहळू अनलॉक ची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
यादरम्यान काही राजकीय संघटनांनी मंदिरे व धार्मिक स्थळे ही सुरू करावी यासाठी आंदोलने केली होती.
त्याचा परिणाम म्हणून कालच्या दिवाळी पासून सर्व धार्मिक स्थळे, काही निर्बंध घालून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.
 |
Shri Vithhal Rukmini , Pandharpur
|
पंढरपूर ही महाराष्ट्राची अध्यात्मिक राजधानी, असून वर्षभरात येथे आषाढी आणि कार्तिकी, अशा दोन मोठ्या यात्रा असतात. यावर्षी कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा, म्हणजेच आषाढी यात्रा, रद्द करण्यात आली. त्यामुळे सर्व वारकरी संप्रदायामध्ये थोडीशी नाराजी होती. परंतु कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, गर्दी टाळणे अत्यावश्यक असल्याने, वारकरी समाजाने आषाढी यात्रेला पंढरपूरला न येता, गर्दी टाळून सरकार आणि प्रशासनास सहकार्य करण्याची भूमिका घेतली, आणि महाराष्ट्रभरातून अगदी मोजक्या वारकऱ्यांसह सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला आल्या. अजिबात गर्दी न करता सर्व नियमांचे पालन करून आषाढी यात्रा संपन्न झाली. त्यानंतर कोरोना चे संकट संपेल आणि कार्तिकी वारी नेहमीप्रमाणे होईल, असेच वारकऱ्यांना वाटत होते. दरम्यान दिवाळीपासून मंदिरे उघडण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे वारकऱ्यांना वारी पूर्ववत संपन्न होईल, असे वाटत असतानाच सोलापूर पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांनी कार्तिकी वारी भरू नये अशी विनंती ती सरकारकडे केली. गर्दीमुळे कोरोना ची दुसरी लाट पसरण्याची भीती असल्याने, कार्तिकी वारी सुद्धा रद्द करून कोरोनाशी लढा द्यावा, असे जिल्हा प्रशासनाने सरकारला सुचवले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य शासनाने वारी न भरण्याचा निर्णय घेतला. यावेळी मात्र सरकारच्या या निर्णयास काही वारकरी संघटनांनी विरोध दर्शवत वारी करण्याचा मानस जाहीरपणे बोलून दाखवला. त्यामुळे वारकरी आणि राज्य शासन यांच्या वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने वारी कालावधीमध्ये पंढरपूर मध्ये संचारबंदी लागू केली. 25 नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून ते 26 नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपर्यंत ही संचार बंदी घालण्यात आली आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने पंढरपुरात मोठा बंदोबस्तही लावला आहे. त्यामुळे यावर्षी कार्तिक वारीला, आषाढी वारी प्रमाणेच, पंढरपुरात सर्वत्र शुकशुकाट दिसत आहे. यावर्षी कार्तिकी वारीला पंढरपुरात वारकरी नसून फक्त पोलिस दिसत आहेत. ऐन वारी कालावधीमध्ये पंढरपुरात संचारबंदी लागू केल्याने वारकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. "कोरोनाचे हे संकट लवकरच दूर व्हावे आणि आम्हाला नेहमीप्रमाणे वारी करून विठुरायाचे दर्शन व्हावे" अशा भावना वारकऱ्यांनी, शिवशाही न्यूज यांच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या आहेत.