सातारा जिल्ह्याला अंमली पदार्थांचा विळखा
शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( प्रतिनिधी शुभम कोदे )
सातारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी तब्बल ११५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडल्याची घटना ताजी असतानाच, आता पर्यटननगरी पाचगणीमध्ये कोकेन जप्त झाल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. पाचगणीसारख्या थंड हवेच्या व पर्यटनासाठी प्रसिद्ध ठिकाणी अमली पदार्थांचे जाळे पसरल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले असून, सातारा जिल्ह्याला अंमली पदार्थांचा विळखा बसत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचगणी पोलिसांनी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवत धडक तपासणी सुरू ठेवली होती. दरम्यान, एका खासगी ठिकाणी पार्टीसाठी जमलेल्या काही व्यक्तांकडे अमली पदार्थ असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे १३ ग्रॅम कोकेन जप्त केले असून, यासह महागड्या गाड्या व इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण सुमारे ४२ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या छाप्यात पार्टीसाठी जमलेल्या सुमारे १० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पर्यटनाच्या नावाखाली थंड हवेच्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री व सेवन होत असल्याचे या घटनेमुळे उघडकीस आले आहे.
सलग घडणाऱ्या मोठ्या कारवायांमुळे सातारा पोलीस अधिक सतर्क झाले असून, या प्रकरणाचे धागेदोरे नेमके कुठपर्यंत पोहोचतात, याचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














