स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
शिवथर (ता. जि. सातारा) येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून तब्बल ₹12,06,000/- रोख लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या १२ तासांत मध्यप्रदेशातून जेरबंद केली. या कारवाईत चोरीतील ₹11,99,000/- रुपये, गुन्ह्यात वापरलेली हुंडाई क्रेटा कार तसेच एटीएम फोडण्यासाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.
६ डिसेंबर रोजी पहाटे २.०५ ते २.२५ वाजण्याच्या सुमारास शिवथर येथील एसबीआय एटीएम गॅस कटरने फोडून चोरट्यांनी रोख रक्कम चोरी केली. तसेच एटीएममधील एसी जाळून सुमारे ₹20,000 चे नुकसान केले. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
सीसीटीव्हीतून सुगावा
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन तपास पथके तयार करण्यात आली होती. एसबीआय एटीएम परिसरातील सीसीटीव्हीतून हुंडाई क्रेटा या संशयित गाडीचा तसेच तिघा आरोपींचा स्पष्ट ठसा मिळाला. बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार हरियानातील मेवात टोळी या प्रकारच्या एटीएम चोरीत सक्रिय असल्याचे समोर आले.
महाराष्ट्र ते मध्यप्रदेशपर्यंत
गुन्हा केल्यानंतर आरोपी पुणे–औरंगाबाद–धुळे मार्गे मध्यप्रदेशकडे रवाना झाल्याचे निश्चित झाल्यावर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मध्यप्रदेशातील धार व इंदूर पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधून तातडीने नाकाबंदी लावण्याचे निर्देश दिले.
धार जिल्ह्यातील पिथमपुर येथे नाकाबंदी दरम्यान संबंधित वाहन हेरून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.
७ तासांत ७०० किमीचा इतिहास
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवघ्या ७ तासांत ७०० किमी अंतर पार करून पिथमपुर येथे पोहोचले. चौकशीदरम्यान संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अटक आरोपी :
1. हसमदिन अल्लाबचाए खान (54) – राजस्थान
2. सलीम मुल्ली इस्ताक (25) – हरियाणा
3. राहुल रफिक (30) – हरियाणा
तिघेही गुन्हेगार हरियाणा, राजस्थान, गुजरात, आसाम, कर्नाटकमध्ये एटीएम चोरीचे अभिलेखावरील गुन्हे असलेले आहेत.
जप्त रक्कम ₹11,99,000/-
जप्त वाहन : हुंडाई क्रेटा
इतर साहित्य : एटीएम फोडणीची उपकरणे
आरोपींना दि. १० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे करीत आहेत
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांचे सहकार्य उल्लेखनीय राहिले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पथकाचे अभिनंदन केले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














