आजची लहान मुलेच उद्याचे जबाबदार नागरिक : खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
देशाच्या आणि आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी ज्या वीर जवानांनी आपले प्राण अर्पण केले, अशा हुतात्म्यांच्या स्मरणार्थ व सन्मानार्थ सातारच्या नभांगणात भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीमचा नेत्रदीपक एअर शो पार पडला. "या उपक्रमाच्या माध्यमातून कार्यरत जवानांच्या कार्याचा गौरव करत भावी पिढीमध्ये करिअरची योग्य दिशा आणि समाजसेवेची भावना रुजवली जाईल. आजची लहान मुलेच उद्याचे जबाबदार नागरिक बनणार आहेत," असे प्रतिपादन खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी यावेळी केले.
सैनिक स्कूल सातारा येथील फुटबॉल मैदानावर हा विशेष हवाई प्रात्यक्षिक सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, भारतीय हवाई दलाचे स्क्वाड्रन लीडर एडवर्ड प्रिन्स, सैनिक स्कूलचे प्राचार्य कॅप्टन रामनाथन यांच्यासह प्रशासकीय व लष्करी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले की, "शहीद जवानांचे बलिदान प्रत्येकाच्या मनात कायमस्वरूपी जिवंत राहायला हवे. शहीद झालेल्या आणि सीमेवर कार्यरत असणाऱ्या भारतीय जवानांमुळेच आज आपण सर्वजण सुखरूप आणि निवांत जीवन जगत आहोत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील शहिदांना आदरांजली वाहण्याच्या स्मरणदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यातून तरुण वर्गाला संरक्षण दलातील विविध करिअर संधींची माहिती मिळून देशसेवेची प्रेरणा मिळेल."
९ विमानांची जमिनीपासून १ हजार फुटांपेक्षा कमी उंचीवरून उड्डाणे
भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ एरोबॅटिक टीममधील ९ विमानांनी जमिनीपासून एक हजार फुटांपेक्षा कमी उंचीवरून केलेल्या शिस्तबद्ध, चित्तथरारक आणि नेत्रदीपक कसरतींनी उपस्थित सातारकरांचे डोळे दिपवून टाकले. विमानांची अचूकता आणि वैमानिकांचे कौशल्य पाहून मैदानावर उपस्थित असलेल्या हजारो विद्यार्थी आणि नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात जवानांना दाद दिली.
संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
या ऐतिहासिक सोहळ्यात संविधान दिनाचे औचित्य साधून उपस्थित हजारो विद्यार्थी, नागरिक आणि मान्यवरांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. राष्ट्रभक्ती आणि संवैधानिक मूल्यांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भारावून गेला होता.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




