पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

राज्यस्तरीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवी दिशा मिळणार
Deputy Chief Minister Sunetra Ajit Pawar, Satara, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,सातारा (शुभम कोदे) 

शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक आहे. बदलते हवामान, अनियमित पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार अशा आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतीसोबत पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कृषी प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांचा अवलंब करणे गरजेचे आहे. या दृष्टीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान, आधुनिक साधने आणि व्यवसायाच्या संधींची माहिती देणारे मार्गदर्शक व्यासपीठ ठरेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

कराड येथे २१ व्या राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सव २०२६ चे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, आमदार मनोज घोरपडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदयसिंह उंडाळकर, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या, शेतकरी हा देशाच्या विकासाचा कणा आहे. शेती क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान, सुधारित कृषी अवजारे, सिंचन पद्धती, पशुपालन, दुग्ध व्यवसाय, कृषी प्रक्रिया उद्योग आणि शेतीपूरक व्यवसायांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा प्रदर्शनांची आवश्यकता आहे. स्वर्गीय विलासराव उंडाळकर यांच्या विचारांतून सुरू झालेल्या या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना विविध प्रयोग पाहण्याची, नवीन तंत्रज्ञान समजून घेण्याची आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळत आहे.

सध्याच्या काळात राज्यासमोर दुष्काळसदृश परिस्थितीचे आव्हान आहे. हवामानातील बदल, पावसाची अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेती क्षेत्रासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी केवळ पीक उत्पादनावर अवलंबून न राहता पशुपालन, दुग्ध व्यवसाय आणि कृषी प्रक्रिया उद्योग यांसारख्या पूरक व्यवसायांकडे वळावे. शेतीला उद्योगाची जोड मिळाल्यास ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल.

दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांच्या काळात शेतकऱ्यांना आधार देणे हे शासनाचे प्राधान्य आहे. पिकांचे नुकसान आणि आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा भार कमी करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. या संकटाच्या काळात शासनासोबतच प्रशासन, सहकारी संस्था, कृषी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. पाण्याचा काटकसरीने वापर, जलसंधारण, पाणी नियोजन आणि उपलब्ध जलसंपत्तीचा योग्य वापर यावर सर्वांनी भर द्यावा. संकट कितीही मोठे असले तरी एकजुटीने त्याचा सामना केल्यास त्यातून मार्ग निघू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. कराडच्या भूमीशी अजितदादांचे जिव्हाळ्याचे नाते होते. प्रीतिसंगम ही राज्याच्या विकासाचा संगम घडविणारी भूमी आहे. कराडने देशाला दिशा देण्याचे काम केले असून सहकार चळवळीच्या विकासात या भूमीचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. गावागावांत विकास पोहोचला पाहिजे, शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, हा विकासाचा विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. विकासकामांचा अभ्यास, निर्णयक्षमता, वेळेचे नियोजन आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याची तळमळ ही अजितदादांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती. त्यांच्या विकासाच्या संकल्पना पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

शेतीकडे केवळ पारंपरिक व्यवसाय म्हणून न पाहता आधुनिक उद्योग आणि रोजगारनिर्मितीचे साधन म्हणून पाहण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रातील नव्या संधींची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांसह युवकांनीही या प्रदर्शनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. कृषी उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होऊ शकतात, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.

या प्रदर्शनाच्या आयोजनासाठी कृषी विभाग, जिल्हा परिषद आणि आत्मा विभागासह संबंधित संस्था, पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक प्रयत्न केले आहेत. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले आणि राज्यस्तरीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक, पशुपक्षी प्रदर्शन व जिल्हा कृषी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.

        -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !