सोलापूरच्या राजकारणात खळबळ, मंत्री जयकुमार गोरेंच्या दाव्याने चर्चांना उधाण
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील (नारायण आबा) यांनी भाजप उमेदवारांना व महायुतीला पाठिंबा दिल्याचे खळबळजनक विधान जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. बार्शी येथे आयोजित एका बैठकीनंतर त्यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
बार्शीतील बैठकीने वेधले लक्ष
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. विशेष म्हणजे, या बैठकीला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार नारायण पाटील यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. एकीकडे पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने हर्षदा देशमुख निवडणुकीच्या रिंगणात असताना, पक्षाच्या आमदारांची या बैठकीतील उपस्थिती राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना निमंत्रण देणारी ठरली.
पालकमंत्री जयकुमार गोरेंचे मोठे विधान
या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीला मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत मोठे दावे केले. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार नारायण आबा यांचा भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा आहे. तसेच सांगोल्याचे शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांचाही भाजपचे उमेदवार व महायुतीला पूर्ण पाठिंबा आहे. एवढेच नव्हे, तर या निवडणुकीत इतर जे कोणी राहिले असतील, त्या सर्वांचा पाठिंबा भाजप-महायुतीच्या पाठीशी आहे.” गोरेंच्या या दाव्यामुळे विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
जानकरांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाबाबत गेल्या काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहेत. त्यातच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जानकर यांच्या पाठिंब्याबाबत उघडपणे भाष्य केल्याने या चर्चांना आता अधिकच बळ मिळाले आहे. जानकर यांचा हा पाठिंबा केवळ निवडणुकांपुरता मर्यादित आहे की ते लवकरच भाजपचा झेंडा हाती घेणार? याविषयी राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. आता यावर खुद्द आमदार उत्तमराव जानकर काय स्पष्टीकरण देतात, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
सोलापूर जिल्हा आघाडी घेणार - मंत्री गोरेंचा विश्वास
आगामी निवडणुकीतील विजयाचा दावा करताना मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्ह्याबाबत मोठा विश्वास व्यक्त केला. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्याने दिलेल्या निकालांपेक्षा यंदाचा निकाल अधिक सरस असेल. पदवीधर मतदारसंघासोबतच शिक्षक मतदारसंघातही भाजपचा उमेदवार विक्रमी मताधिक्याने आघाडी घेईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोहिते-पाटलांच्या भूमिकेकडे राजकीय नजर
पालकमंत्र्यांच्या या दाव्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे राजकीय समिकरण वेगाने बदलताना दिसत आहेत. या संपूर्ण घडामोडींवर माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि महाविकास आघाडीचे इतर प्रमुख नेते नेमकी काय प्रतिक्रिया देणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जानकरांची नेमकी भूमिका काय असणार, हे आगामी काळात स्पष्ट होईलच, परंतु या विधानामुळे सोलापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











