ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, महिला व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व सेवा संकल्प अभियानांतर्गत टंचाई निवारणाच्या उद्देशाने वेळे येथे लोकसहभागातून वनराई बंधारा बांधण्यात आला. वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
वनराई बंधारा बांधण्यासाठी वेळे ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच विविध शासकीय यंत्रणांतील सेविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच सिंधु ढमाळ, ग्रामपंचायत अधिकारी श्रुतिका जाधव, पालक अधिकारी रुपाली कुदळे, ग्रामपंचायत सदस्य राहुल ननावरे, दशरथ पवार, ग्रामसंघाच्या अध्यक्षा, सीआरपी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच महिला ग्रामस्थ उपस्थित होत्या.
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या उपाययोजना करण्याच्या उद्देशाने हा बंधारा बांधण्यात आला.
‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संदेशातून जलसंवर्धनाचे महत्त्व ग्रामस्थांपर्यंत पोहोचविण्यात आले. शासनाच्या अभियानाला लोकसहभागाची जोड मिळाल्याने वेळे येथे जलसंधारणाच्या कामाला चालना मिळाली आहे.
लोकसहभागातून राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत असून, वेळे गावाने इतर गावांसाठी श्रमदानाचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











