पत्रकार राधेश्याम हिवाळे यांच्यावरील हल्ल्याचा निषेध; आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाईसाठी SP प्रशांत स्वामी यांना निवेदन
शिवशाही वृत्तसेवा, फुलंब्री (तातेराव बनसोडे)
तालुक्यातील बोगस डॉक्टरांच्या भ्रष्टाचाराचा आणि नागरिकांच्या जिवाशी होणाऱ्या खेळाचा पर्दाफाश करणारी बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून पत्रकार राधेश्याम हिवाळे यांच्यावर बोगस डॉक्टर व त्यांच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण पत्रकार वर्गात तीव्र संतापाची लाट उसळली असून, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने याप्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे. आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून 'पत्रकार संरक्षण कायदा २०१७' अंतर्गत कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांना देण्यात आले आहे.
बातमीचा राग मनात धरून मारहाण
मिळालेल्या माहितीनुसार, बाबरा येथील पत्रकार राधेश्याम हिवाळे यांनी फुलंब्री तालुक्यातील बोगस डॉक्टरांचा विषय गांभीर्याने लावून धरला होता. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या बोगस डॉक्टरांच्या विरोधात त्यांनी वृत्तमाध्यमांतून बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. याच बातमीचा राग मनात धरून संबंधित डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पत्रकार हिवाळे यांना गाठून बेदम मारहाण केली. हा हल्ला म्हणजे थेट अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला हल्ला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
पत्रकार संघटना आक्रमक; पोलिसांना तीव्र इशारा
घटनेची माहिती मिळताच डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रतिनिधींनी एकत्र येत पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. पत्रकारांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. संघटनेने पोलिसांकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
पत्रकार संरक्षण कायदा २०१७: आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई करावी.तातडीने अटक: हल्लेखोर डॉक्टर व त्यांच्या साथीदारांना तात्काळ ताब्यात घ्यावे.पोलीस संरक्षण: पीडित पत्रकार राधेश्याम हिवाळे यांना तातडीने पोलीस संरक्षण पुरवण्यात यावे.बोगस डॉक्टरांवर कारवाई: फुलंब्री तालुक्यातील सर्वच बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी.
अनेक ज्येष्ठ पत्रकारांची उपस्थिती
पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी यांना निवेदन देताना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश नेटके, 'सूर्यवर्ता'चे मुख्य संपादक प्रकाश सातपुते, जिल्हा सचिव रवींद्र प्रकाश खरात, केंद्रीय पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष फेरोज शेख, 'शब्दमत'चे मुख्य संपादक अजमत पठाण, कन्नड तालुका अध्यक्ष शिवाजी नवले, 'लॉर्ड महाराष्ट्र'चे मुख्य संपादक अक्षय ताठे, 'साडे तोड उत्तर'चे संपादक ॲड. रत्नाकर चौरे, 'कर्तुत्ववान शेतकरी'चे मुख्य संपादक बापू लोखंडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पत्रकार व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











