चोरट्यांचा बंदोबस्त करून वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालण्याची ग्रामस्थांची मागणी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
ढेबेवाडी (ता. पाटण) येथील मगर बंधू ज्वेलर्स या सराफ दुकानात काल (दि. १६ ऑक्टोबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली. अज्ञात व्यक्तींनी दुकानातून सुमारे नऊ तोळे सोने चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
ढेबेवाडी विभागात चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. व्यापारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांनी अशा घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या घटनेतील संशयित व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन चोरीस गेलेले सोने हस्तगत करावे, संबंधित व्यक्तीला अटक करून कायदेशीर कारवाई करावी, तसेच ढेबेवाडी विभागातील संवेदनशील ठिकाणी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.
भरदिवसा सराफ दुकानात चोरीची घटना घडल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, ढेबेवाडी पोलीस प्रशासन या प्रकरणात काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











