अन्नसुरक्षा नियमांचे पालन करा ग्राहकांचा विश्वास जिंका

वाई व्यापारी महासंघ व अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा,परवाना, स्वच्छता, खाद्यपदार्थांतील रंग आणि तेलाच्या वापराबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन
Food Safety Rules, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

अन्न व्यवसाय करताना कायदेशीर नियमांचे पालन करणे, ग्राहकांच्या आरोग्याला प्राधान्य देणे आणि अन्नसुरक्षेच्या बदलत्या नियमांची माहिती ठेवणे ही प्रत्येक व्यापाऱ्याची जबाबदारी आहे. व्यवसायासाठी आवश्यक परवाना, ग्राहकांच्या बिलावर एफएसएसएआय क्रमांक, स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी आणि खाद्यपदार्थांमध्ये रंग व तेलाचा योग्य वापर याबाबत व्यापाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी केले.

वाई व्यापारी महासंघ आणि अन्न व औषध प्रशासन, विभाग सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य टिळक वाचनालयात मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) सायं. ४ वा. आयोजित अन्नसुरक्षा व व्यवसाय मार्गदर्शन कार्यशाळेत व्यापाऱ्यांना विविध नियमांची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. व्यापारी महासंघातर्फे उपस्थित अधिकाऱ्यांचे तसेच पत्रकार बांधवांचे स्वागत करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष हेमंत येवले यांनी प्रास्ताविकात व्यापाऱ्यांना व्यवसायासंदर्भातील कायदेशीर तरतुदींची माहिती मिळावी आणि त्यांच्या शंकांचे निरसन व्हावे, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन केल्याचे सांगितले.

परवाना आणि संपर्क माहिती अद्ययावत ठेवा!
अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांनी अन्नसुरक्षा कायद्याचे महत्त्व स्पष्ट करताना व्यापाऱ्यांनी आवश्यक परवाना घेऊनच व्यवसाय करावा, असे सांगितले. परवान्यावरील स्वतःचा मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अद्ययावत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रशासनाकडून येणाऱ्या सूचना, कायदेशीर पत्रव्यवहार तसेच कारवाईसंबंधी कागदपत्रे याच माध्यमातून पाठवली जातात. त्यामुळे परवान्यावर इतर व्यक्तींचे संपर्क क्रमांक असल्यास ते बदलून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.

अन्नपदार्थांमध्ये परवानगीपेक्षा अधिक प्रमाणात रंगांचा वापर करू नये. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यापाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई होऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला. दुधाच्या वाहतुकीसाठी स्टीलचे कॅन वापरण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. वारंवार तळण्यासाठी वापरले जाणारे तेल अतिप्रमाणात किंवा दीर्घकाळ तापविल्यास त्याची गुणवत्ता खालावते आणि आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तेलाचा योग्य वापर व वेळेवर बदल करण्याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली. 

अन्न व औषध प्रशासनाचा कायदा आणि त्यातील वेळोवेळी होणारे बदल व्यापाऱ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. किराणा दुकाने, हॉटेल्स, दुग्धव्यवसाय तसेच शासकीय योजनांशी संबंधित अन्नवितरण व्यवस्थेतही अन्नसुरक्षेच्या नियमांचे पालन महत्त्वाचे असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. व्यापाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांमध्येही अन्नसुरक्षेबाबत जागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

स्वच्छता, पेस्ट कंट्रोल आणि नोंदींकडे दुर्लक्ष नको!
अन्न सुरक्षा अधिकारी अल्पना गायकवाड यांनी अन्न व्यवसायासाठी आवश्यक नोंदणी व परवान्यांबाबत माहिती दिली. शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून संबंधित व्यवसायाच्या प्रकारानुसार नोंदणी किंवा परवाना प्रक्रिया पूर्ण करावी. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या बिलावर एफएसएसएआय क्रमांक नमूद करणे, दुकानातील रॅक, काउंटर आणि साठवण क्षेत्र स्वच्छ ठेवणे तसेच स्वच्छतेच्या नोंदी जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
दुकानात झाकण असलेल्या कचराकुंड्या ठेवणे, पिण्यायोग्य पाण्याचा वापर करणे, उपकरणांची स्वच्छता राखणे आणि कीड नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करून त्याच्या पावत्या जतन करणे यावर त्यांनी भर दिला. पाण्याची गुणवत्ता तपासणे आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्वच्छता पाळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अन्न हाताळताना टोपी, एप्रन आणि आवश्यकतेनुसार हातमोजे वापरणे, पॅकेज्ड खाद्यपदार्थांवर उत्पादन तारीख, वापरण्याची अंतिम तारीख आणि आवश्यक माहिती स्पष्टपणे नमूद असणे, तसेच हॉटेलमध्ये कच्चे आणि शिजवलेले पदार्थ स्वतंत्र ठेवणे आवश्यक आहे. अन्नपदार्थांपासून रसायने व स्वच्छतेसाठी वापरली जाणारी सामग्री वेगळी ठेवावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

ग्राहकांना स्वच्छ पाणी देणे बंधनकारक!
अन्न सुरक्षा अधिकारी प्रियांका वाईकर यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी अन्नसुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे महत्त्व सांगितले. हॉटेल चालकांनी अन्नसुरक्षा परवाना दर्शनी भागात लावावा आणि अन्न तयार करण्यासाठी केवळ पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

हॉटेलमध्ये ग्राहकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असून, बाटलीबंद पाणी खरेदी करण्याची सक्ती करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र भांडी व चॉपिंग बोर्ड वापरणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक तपासण्यांकडे लक्ष देणे आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

ग्राहकांच्या तक्रारींची नोंद घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र नोंदवही ठेवावी. दुकान आणि गोदामासाठी लागू असलेल्या परवाना अटींची पूर्तता करावी. शेतमालाची थेट विक्री आणि त्यावर प्रक्रिया करून विक्री करणे यांतील परवाना नियमांमधील फरकही व्यापाऱ्यांनी समजून घ्यावा, असे वाईकर यांनी सांगितले.

व्यापारी-प्रशासन समन्वयावर भर
यावेळी उपस्थित व्यापारी बांधवांनी संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या अडचणी तसेच काही प्रश्न विचारले. त्या सगळ्या प्रश्नांचे योग्य ते निरसन मार्गदर्शक अधिकाऱ्यांकडून करण्यात आले. अन्नसुरक्षेचे नियम हे केवळ कायदेशीर बंधन नसून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक आहेत. नियमांची अचूक माहिती, स्वच्छतेच्या चांगल्या सवयी आणि सुरक्षित अन्न हाताळणी यांमुळे ग्राहकांचा विश्वास वाढतो, तसेच व्यवसायाची विश्वासार्हताही टिकून राहते. व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी अशा कार्यशाळा उपयुक्त ठरतात, असा सूर या कार्यक्रमातून व्यक्त झाला.

यावेळी वाई व्यापारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत येवले, उपाध्यक्ष प्रताप खामकर, उमेश शहा, सचिव राहुल जायगुडे, सहसचिव सागर मुळे, खजिनदार प्रसाद चारेगावकर, महासंघाचे सभासद आणि शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रताप खामकर यांनी आभार मानले.
       -----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !