भुईंज पोलिसांनी घेतली मराठी संवर्धनाची प्रतिज्ञा
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
वाई - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार भुईंज पोलीस ठाण्यात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मराठी भाषेचा अभिमान जपत तिच्या संवर्धनाचा संकल्प केला.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. स्वराज्याच्या कारभारात मराठी भाषेला प्रशासकीय व्यवहाराची प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या कार्याचे स्मरण करून उपस्थितांनी मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा जागर केला.
भुईंज पोलीस ठाण्याच्या प्रभारी परविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक पुनम झगडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी व अंमलदारांनी ‘मराठी भाषा अंगीकार व संवर्धन प्रतिज्ञा’ घेतली.
शासकीय कामकाजात जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर करणे, मराठी भाषेचे अभिजातत्व जपणे, तिचे संवर्धन करणे तसेच मराठी भाषेबद्दल अभिमान बाळगणे, असा निर्धार यावेळी करण्यात आला.
पोलीस ठाण्याच्या दैनंदिन प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर वाढवून नागरिकांशी संवाद अधिक सुलभ व आपुलकीचा करण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमास पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्थेचे कर्तव्य बजावतानाच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी घेतलेला हा पुढाकार स्थानिक नागरिकांकडून विशेष कौतुकास्पद ठरत आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











