महिला तक्रारदारांशी गैरवर्तन, पैशांच्या मागणीचा आरोप; होमगार्ड प्रकरणातील घटनाक्रमावरून प्रश्नांची सरबत्ती
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप जालिंदर जाधव यांच्या निलंबनामुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. तक्रारींबाबत वरिष्ठांना माहिती न देणे, गुन्हा दाखल न करण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप, होमगार्ड मारहाण प्रकरणात परस्पर तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न आणि महिला तक्रारदारांसह महिला पोलीस अंमलदारांशी असभ्य वर्तन केल्याच्या आरोपांवरून सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी ही कारवाई केल्याचे समजते. दरम्यान, आणखी दोन पोलीस अंमलदारांचेही निलंबन झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
या संपूर्ण प्रकरणात होमगार्डशी संबंधित घटनाक्रम चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित वादानंतर त्यांनी एपीआय जाधव यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर जाधव यांनी त्यांना आणि संबंधित होमगार्डला किसनवीर महाविद्यालयात बोलावले. तेथे चर्चा झाल्यानंतर होमगार्डला सोडून आपण निघून गेल्याचे गायकवाड यांनी सांगितल्याचे नमूद करण्यात आले आहे.
मात्र, दुसरीकडे तक्रारदारांकडून होमगार्डला बळजबरीने वाहनात बसवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही दाव्यांमधील वस्तुस्थिती काय, हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
संबंधितांना पोलीस ठाण्याऐवजी महाविद्यालयात का बोलावण्यात आले? तेथे नेमकी कोणती चर्चा झाली? या प्रश्नांची उत्तरे तपासातूनच स्पष्ट होऊ शकतात.
एपीआय जाधव यांच्याविरोधातील पैशांच्या मागणीचा आरोप आणि महिला तक्रारदारांशी गैरवर्तनाच्या तक्रारींचीही स्वतंत्रपणे पडताळणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणात राजकीय दबाव होता का, तसेच संबंधित घटनांमागे अन्य काही कारणे होती का, याबाबत व्यक्त होणाऱ्या दाव्यांचीही पुराव्यांच्या आधारे तपासणी होणे गरजेचे आहे.
दरम्यान, आणखी दोन पोलीस अंमलदारांवर निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती समोर येत असल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, संबंधित अंमलदारांची नावे, निलंबनाची कारणे आणि कारवाईचा अधिकृत तपशील अद्याप स्पष्ट झालेला नाही.
पोलीस यंत्रणेवरील नागरिकांचा विश्वास टिकवण्यासाठी तक्रारींची निष्पक्ष चौकशी आणि कारवाईतील पारदर्शकता महत्त्वाची आहे. त्यामुळे एपीआय जाधव यांच्या निलंबनामागील अधिकृत कारणे, होमगार्ड प्रकरणातील घटनाक्रम आणि इतर दोन अंमलदारांवरील कारवाईची वस्तुस्थिती स्पष्ट होणे आवश्यक आहे.
संबंधित सर्व व्यक्तींच्या बाजू ऐकून, उपलब्ध पुरावे आणि नोंदी तपासून चौकशी पूर्ण करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आरोप सिद्ध होण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरवणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे या प्रकरणातील अधिकृत चौकशीचा निष्कर्ष आता महत्त्वाचा ठरणार आहे.
-----------------
----------------
----------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा











