सहकाराला अध्यात्म व आधुनिकतेची जोड दिल्याने शिवकृपा सहकारी पतपेढीची घोडदौड

नातेपुते शाखेचे दिमाखात उद्घाटन
Shivkrupa Cooperative Credit Society’s Rapid Progress, Natepute Branch Inaugurated, malshiras, solapur, shivshahi news, 
शिवशाही वृत्तसेवा, सोलापूर (वैभव कुलकर्णी)
नातेपुते - 20 सप्टेंबर 2026 : सहकारातील पारदर्शक कारभार, आधुनिक तंत्रज्ञान, विज्ञानवादी दृष्टिकोन आणि अध्यात्माची सांगड घालत शिवकृपा सहकारी पतपेढीने सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. संस्थेची आर्थिक प्रगती आणि कार्यपद्धती कौतुकास्पद असून नातेपुते परिसरातील इतर सहकारी संस्थांनी शिवकृपाच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन समाजभूषण नानासाहेब देशमुख एज्युकेशन सोसायटी, नातेपुतेचे तसेच माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सोलापूर मा. शहाजीराव मुधोजीराव तथा बाबाराजे देशमुख यांनी केले.

शिवकृपा सहकारी पतपेढी लि., मुंबईच्या सोलापूर विभागातील नातेपुते शाखा कार्यालयाचा उद्घाटन समारंभ रविवार, दि. 20 सप्टेंबर रोजी श्री शंभू महादेव भंडारगृह संस्थान, शिखर शिंगणापूरचे मठाधिपती श्री राजगुरू 108 ष. ब्र. सिद्धलिंग शिवाचार्य इनामदार यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. सौ. अनिता नंदू लांडगे, नगराध्यक्ष, नातेपुते नगरपंचायत तसेच नातेपुते व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मा. श्री. बाहुबली चंद्रशेखर चंकेश्वरा उपस्थित होते.

६३०० कोटींचा संमिश्र व्यवसाय
यावेळी बोलताना बाबाराजे देशमुख यांनी शिवकृपा सहकारी पतपेढीच्या कार्याचे कौतुक केले. “शिवकृपा ही सहकारातील आदर्श व अग्रगण्य संस्था असून सहकाराला अध्यात्माची जोड देणारी महाराष्ट्रातील एकमेव पतसंस्था आहे. संस्थेच्या कार्यपद्धतीचा आदर्श नातेपुते परिसरातील सर्व पतसंस्थांनी घ्यावा. शिवकृपाच्या कामकाजाची आणि आर्थिक प्रगतीची घोडदौड पाहता परिसरातील संस्थांनी त्यांच्या कार्याचा अभ्यास करून प्रशिक्षण घ्यावे,” असे त्यांनी सांगितले.

संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. शिवकृपा ही केवळ आर्थिक संस्था नसून सभासदांच्या विश्वासावर उभी राहिलेली कुटुंबवत्सल संस्था असल्याचे त्यांनी सांगितले.

सहकारातील मूलतत्त्वांची जपणूक, पारदर्शक कारभार, तत्पर सेवा, सहकाराला अध्यात्माची जोड, विज्ञानवादी दृष्टिकोन, आधुनिकतेचा ध्यास, संचालक मंडळाची निःस्वार्थ सेवा, कुशल व प्रशिक्षित कर्मचारीवर्ग तसेच संचालक, कर्मचारी आणि प्रतिनिधींच्या कार्यक्षमतेमुळे संस्थेने आजवर ३६०० कोटी रुपयांच्या ठेवी आणि २७०० कोटी रुपयांचे कर्जवाटप, असा एकूण ६३०० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय साध्य केला असल्याचे त्यांनी सांगितले.

५ लाखांहून अधिक ग्राहकसंख्या असलेली शिवकृपा ही सहकार क्षेत्रातील पहिली संस्था असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. तसेच संस्थेला प्राप्त झालेल्या विविध पुरस्कारांची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

७००० कोटींचे उद्दिष्ट
संस्थेने मार्च २०२७ अखेर ७००० कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. नातेपुते शाखेमुळे या परिसरातील सभासदांना अधिक चांगल्या आणि तत्पर आर्थिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“शिवकृपाला शिवशंभूचा आशीर्वाद”
मठाधिपती श्री राजगुरू 108 ष. ब्र. सिद्धलिंग शिवाचार्य इनामदार यांनी शिवकृपा संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचे कौतुक केले. “संस्थेच्या नावातच ‘शिव’ आहे. त्यामुळे संस्थेला शिवशंभूचा कायम आशीर्वाद लाभत राहील. संस्थापक अध्यक्ष श्री. गोरख चव्हाण यांनी संस्थेला अध्यात्माची जोड दिली असून संचालक मंडळ निःस्वार्थ भावनेने कार्य करीत असल्याने संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नातेपुते व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्री. बाहुबली चंकेश्वरा यांनीही शिवकृपाच्या कार्याचे कौतुक केले. नातेपुते शहरात सुमारे १६०० छोटे-मोठे व्यावसायिक कार्यरत असून, शिवकृपाच्या शाखेमुळे स्थानिक व्यावसायिकांना आपल्या व्यवसायासाठी आर्थिक सुविधा उपलब्ध होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. व्यावसायिकांनी शिवकृपाच्या आर्थिक सुविधांचा लाभ घेऊन स्वतःबरोबर संस्थेचाही विकास साधावा, असे आवाहन त्यांनी केले. नगराध्यक्ष मा. सौ. अनिता नंदू लांडगे यांनीही संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सत्यनारायण महापूजेने वातावरण भक्तिमय
उद्घाटन सोहळ्यानिमित्त शाखा कार्यालयात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक, व्यापारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढविली. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे ज्येष्ठ संचालक श्री. शिरीष देशमुख, संचालक श्री. सुरेश संकपाळ, श्री. बाळासाहेब मोहिते, श्री. राजेंद्र पवार, श्री. संतोष चव्हाण, श्री. किशोर माने, कर्मचारी प्रतिनिधी व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष श्री. रामदास कर्णे, पुणे झोनचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. निलेश वीर, सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर बांदल यांच्यासह कर्मचारीवृंद आणि दैनंदिन ठेव संकलन प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे झोनचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्री. निलेश वीर यांनी केले, तर कार्यक्रमाचे नियोजन सोलापूर विभागाचे विभागीय अधिकारी श्री. ज्ञानेश्वर बांदल यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात व सांगता प्रार्थना आणि पसायदानाने करण्यात आली.
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !