जिल्हा बँकेच्या जागावाटपाचा तिढा कसा सुटणार ? मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांची मुंबईत बैठक

भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी - ११ जागांच्या मागणीने महायुतीसमोर पेच, पक्षांतर्गत वाटपासाठी वरिष्ठ नेतृत्वाची कसोटी
DCC Bank election, BJP, jaykumar gore, shivendra Raje Bhosale, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (शुभम कोदे)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून एकत्रित मैदानात उतरण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच जागावाटपाचा तिढा आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आज मुंबईत असल्याने त्यांच्या बैठकीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला या चर्चेतून स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी भाजपकडून ११ जागांची मागणी केली जाण्याची शक्यता आहे. उर्वरित दहा जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला किती जागा मिळणार, याबरोबरच कोणत्या नेत्याच्या प्रभावक्षेत्राला किती प्रतिनिधित्व द्यायचे, हा खरा पेच आहे. त्यामुळे हे जागावाटप केवळ आकड्यांचे गणित न राहता महायुतीतील आगामी राजकीय समीकरणांची चाचणी ठरणार आहे.

भाजपच्या संभाव्य ११ जागांसाठी इच्छुकांची संख्या वाढत असल्याने पक्षातील नेत्यांसमोरील डोकेदुखी वाढली आहे. खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार मनोज घोरपडे आणि डॉ. अतुल भोसले यांच्या समर्थकांकडून जागांसाठी जोरदार मोर्चेबांधणी होण्याची शक्यता आहे.

उपलब्ध जागांपेक्षा इच्छुकांची संख्या अधिक असल्याने प्रत्येक गटाला समाधानकारक प्रतिनिधित्व देताना भाजप नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. स्थानिक पातळीवर तिढा न सुटल्यास वरिष्ठ नेतृत्वाचा हस्तक्षेप अपरिहार्य ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

उदयनराजे भोसले यांच्या गटाकडून दोन जागांची मागणी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जयकुमार गोरे यांच्या गटाकडूनही दोन ते तीन जागांसाठी आग्रह धरला जाऊ शकतो. दुसरीकडे, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रभावक्षेत्राचा विचार करून त्यांच्या समर्थकांना किती जागा द्यायच्या, हा भाजप नेतृत्वासमोरील महत्त्वाचा प्रश्न आहे.

जिल्हा बँकेत यापूर्वी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचारांचे सर्वाधिक संचालक होते. त्यामुळे महायुतीच्या नव्या समीकरणात त्यांच्या गटाला किती जागा मिळतात, याकडे विशेष लक्ष लागले आहे. मतदारसंघ आणि राखीव जागा मिळून दहा जागांच्या वाटपात शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाचा पाच जागांचा प्रभाव कायम राहणार का? हा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे.

भाजपला ११ जागा मिळाल्यास उर्वरित दहा जागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार नितीन पाटील, मंत्री मकरंद पाटील तसेच शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांच्यासह अन्य नेत्यांना प्रतिनिधित्व द्यावे लागणार आहे. विशेषतः राखीव पाच जागांचे वाटप महायुतीच्या चर्चेतील सर्वाधिक संवेदनशील मुद्दा ठरण्याची शक्यता आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सातारा, कराड, फलटण आणि खटाव या तालुक्यांतील मतदारसंख्या आणि संस्थांचे प्रतिनिधित्व महत्त्वाचे ठरणार आहे. अधिक मतदारसंख्या असलेल्या भागांना अधिक जागा देण्याचे सूत्र स्वीकारले गेल्यास या तालुक्यांतील नेत्यांचे राजकीय वजन वाढू शकते. त्यामुळे जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच इच्छुकांकडून आपापल्या नेत्यांकडे जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

महायुतीला २१ जागांचा अंतिम फॉर्म्युला निश्चित करण्यापूर्वी भाजपमधील अंतर्गत जागावाटपाचा पेच सोडवावा लागणार आहे. मुंबईतील चर्चेत प्राथमिक तोडगा निघाला तरी अंतिम निर्णयासाठी वरिष्ठ नेतृत्वाची मंजुरी आवश्यक ठरू शकते. त्यामुळे आजच्या मुंबईतील बैठकीत कोणता फॉर्म्युला पुढे येतो आणि कोणाच्या वाट्याला किती जागा येतात, याकडे सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील नेत्यांची ताकद, प्रभावक्षेत्र आणि संघटनात्मक पकड यांचेही राजकीय गणित मांडले जाणार आहे.

जिल्हा बँकेचे मतदार
९६३ — सोसायटी प्रतिनिधी
३७९ — नागरी बँका व पतसंस्था
३४३ — औद्योगिक, विणकर-मजूर संस्था
२९५ — गृहनिर्माण व दूध संस्था
२९ — कृषी प्रक्रिया संस्था
१० — खरेदी-विक्री संस्था
-----------------
Royal safar tours and travels, car rental, pandharpur, Solapur, shivshahi news,

----------------

Shivshahi news, anniversary, Maharashtra,

----------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !