तातडीने बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वेरूळी (ता. वाई) परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढला असून, मंगळवार दि. १८ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बिबट्याने एका शेतकऱ्याच्या शेळीवर हल्ला करत तिला जागीच फस्त केले. या घटनेमुळे शेतकरी व पशुपालकांमध्ये तीव्र दहशत पसरली असून, वन विभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
वेरूळी येथील शेतकरी जगन्नाथ पवार यांची शेळी नेहमीप्रमाणे शेतात असताना, दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात शेळीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संतोष मांढरे (फौजी) यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पीडित शेतकऱ्याला धीर दिला आणि वन विभागाला घटनेची त्वरित माहिती दिली.
सध्या खरिपाची कामे अंतिम टप्प्यात असल्याने आणि जनावरांच्या चाराचा प्रश्न असल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने शेतात जावे लागत आहे. मात्र, परिसरात बिबट्याचा सतत वावर असल्याने शेतकऱ्यांच्या जीवाशी धोक्यात आला आहे.
दरम्यान, बिबट्याचा वावर असलेल्या भागात वन विभागाने तातडीने पिंजरा बसवावा, वन कर्मचाऱ्यांमार्फत परिसरात गस्त वाढवून नागरिकांना सतर्क करावे, तसेच शेळी गमावलेल्या शेतकरी जगन्नाथ पवार यांना शासनाकडून तात्काळ योग्य ती आर्थिक मदत मिळावी, अशा मागण्या स्थानिक ग्रामस्थांनी केल्या आहेत.
बिबट्याचा बंदोबस्त होईपर्यंत सायंकाळच्या किंवा अंधाऱ्या वेळेत शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे आणि आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी गोठ्यात बंदिस्त करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. वन विभागाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलनाचा इशारा वेरूळीच्या ग्रामस्थांनी दिला आहे.
-----------------
-----------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
--------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



























