प्रशासकीय अनास्थेमुळे विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य ग्रामस्थ जीव मुठीत धरून करतात प्रवास
शिवशाही वृत्तसेवा, माळशिरस (प्रतिनिधी वैभव कुलकर्णी)
माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ते शिंदेवाडी हा रस्ता सध्या अत्यंत दयनीय व अपूर्ण अवस्थेत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासकीय अनास्थेमुळे विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य ग्रामस्थ जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत दरवर्षी प्रशासनाकडे दाद मागितली जाते, मात्र दरवेळी 'निधी उपलब्ध नाही' किंवा 'पावसाळ्याचे कारण' पुढे करून प्रशासन टोलवाटोलवी करत आहे. या अनास्थेचा ग्रामस्थांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे.
यापूर्वीही स्थानिक प्रसारमाध्यमांनी या जीवघेण्या रस्त्याचा प्रश्न लावून धरला होता आणि बातमीच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र, प्रशासनाने माध्यमांच्या या वृत्तांकनाचीही दखल न घेता, 'पावसाचे कारण' व निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत रस्ता दुरुस्तीकडे गांभीर्यपूर्वक पाहिलेले नाही. अनेक वेळा ग्रामस्थांच्या वतीने या संदर्भात निवेदन दिली आहेत. तरीही प्रशासन केवळ आश्वासने देऊन वेळ मारून नेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
धर्मपुरी - गणेश मंदिर ते शिंदेवाडी या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी ये-जा करतात. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या जिव मुठीत धरून प्रवास करत आहेत, पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचून राहत असल्याने ते खड्डे दिसत नाहीत त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
रस्त्यावर काही दिवसांपूर्वी करण्यात आलेली 'तात्पुरती खड्डे भरणी' होय. मात्र, , रस्ता पुन्हा जैसे थे किंवा त्यापेक्षा अधिक खराब झाला आहे. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
तातडीची दुरुस्ती केवळ दिखावा?
काही काळापूर्वी प्रशासनाने गणेश मंदिर ते शिंदेवाडी या मार्गावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरले होते. मात्र, खड्डे पुन्हा जसेच्या तसे उघडे पडले आहेत, किंबहुना त्यांची व्याप्ती अधिक वाढली आहे.
रुग्ण व गरोदर महिलांची असह्य ओढाताण
केवळ विद्यार्थीच नव्हे, तर या मार्गावरून प्रवास करताना गरोदर महिला, गंभीर आजारी रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचण्यासही या रस्त्यामुळे अडथळे येत आहेत, तरीही प्रशासन निधीचा अभाव व पावसामुळे अडथळा कारण, सांगून जबाबदारी झटकत आहे. त्यामुळे चालू झालेले काम अपूर्णच आहे.
रस्त्याच्या या भीषण दुरवस्थेचा थेट फटका शिंदेवाडीतील छोट्या व्यावसायिकांना बसला आहे. दळणवळण विस्कळीत झाल्यामुळे अनेक दुकाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कष्टकरी वर्गाचा रोजगार हिरावला जात असताना प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.
प्रशासनाला १५ दिवसांची 'डेडलाईन'
अनेकदा पाठपुरावा करूनही केवळ आश्वासने मिळत असल्याने ग्रामस्थ आता आक्रमक झाले आहेत. १५ दिवसांच्या आत संबंधित विभागाने रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू न केल्यास, रस्ता रोकोसारखे तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
आता पुन्हा एकदा प्रशासन आश्वासनांचा पाढा वाचते की, प्रत्यक्ष कृती करून दाखवते, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



