जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या साधेपणाने गावकरी भारावले - अनेक समस्यांचा जागेवरच निपटारा
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या स्थानिक पातळीवरच सोडवणे, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी तपासणे आणि प्रशासन व सामान्य जनता यांच्यातील अंतर कमी करणे या शासनाच्या मुख्य उद्दिष्टाला अनुसरत सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी एक कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. राज्याचे मुख्य सचिव यांच्या निर्देशानुसार, वाई तालुक्यातील अत्यंत दुर्गम व दऱ्याखोऱ्यात वसलेल्या, बलकवडी धरणाच्या शेजारील पुनर्वसित 'उळुंब' या गावी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा विशेष गावभेट व मुक्काम दौरा नुकताच पार पडला. जिल्ह्याच्या सर्वोच्च प्रशासकीय अधिकाऱ्याने थेट गावात येऊन मुक्काम केल्याने आणि गावकऱ्यांशी जमिनीवर बसून संवाद साधल्याने उळुंबवासियांमध्ये कौतुक आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
'डामडौल' बाजूला सारून पत्रावळीवर भोजन!
नेहमीच्या शासकीय व्हीआयपी (VIP) संस्कृतीला पूर्णपणे फाटा देत जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी अत्यंत साधेपणाने गावकऱ्यांमध्ये सहभाग घेतला. कोणताही डामडौल न ठेवता, जमिनीवर मांडी ठोकून गावकऱ्यांसोबत पत्रावळीवर रात्रीचे भोजन करत त्यांनी आत्मीयतेने संवाद साधला. जिल्हाधिकाऱ्यांचा हा साधेपणा आणि गावकऱ्यांच्याच भाषेत त्यांच्या सुख-दुःखाची केलेली विचारपूस उपस्थितांचे मन जिंकून गेली.
सायंकाळी रंगला 'लोकदरबार'; समस्यांचा जागेवरच निपटारा
या दौऱ्याबाबत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावकऱ्यांना आधीच सूचित करण्यात आले होते. जिल्हाधिकारी गावात दाखल झाल्यानंतर सायंकाळच्या सत्रात भव्य 'लोकदरबार' भरवण्यात आला. यामध्ये महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठा अशा विविध विभागांच्या स्थानिक तक्रारींवर थेट चर्चा करण्यात आली आणि अनेक प्रलंबित समस्यांचा जागेवरच निपटारा करण्यात आला.
गावकऱ्यांनी मांडला मागण्यांचा पाढा:
दुर्गम भागात राहणाऱ्या उळुंबच्या नागरिकांनी आपल्या दैनंदिन व पायाभूत समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या, त्यामध्ये प्रामुख्याने:
गावात कृषी विभागाचे स्वतंत्र कार्यालय सुरू करणे.
वन्य प्राण्यांच्या उपद्रवापासून संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करणे.
गावात रुग्णवाहिकेसाठी (ॲम्बुलन्स) डिझेलची उपलब्धता करून देणे.
बोरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या वाढवणे व शाळेच्या वसतिगृहाला शासकीय मदत मिळणे.
कृषी पर्यटनाला चालना देणे, बोटिंग आणि मासेमारीसाठी परवानगी मिळणे.
रस्त्यांची कामे पूर्ण करून रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षलागवड करणे.
उळुंब, गोळेगाव, जोर, गोळेवाडी या चार गावांमधील पुनर्वसनाची कामे पूर्ण करण्यासाठी शिबीर घेणे.
उळुंबसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत सुरू करून स्थानिक तरुणांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करणे.
जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासनाला कडक व महत्त्वपूर्ण निर्देश:
गावकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना कामाचे स्पष्ट निर्देश दिले.
शेती व फळबाग विकास: गावात कृषी विभागाने फळबाग लागवडीच्या शक्यता तपासाव्यात. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून बांबू लागवड योजना सुरू करावी, तसेच ब्ल्यू बेरी व रास बेरी यांसारख्या आधुनिक पिकांसाठी मार्गदर्शन करावे.
पर्यटन व ब्रँडिंग: गावात पॅडल बोट, जेट्टी तयार करावी. पर्यटनाला चालना देण्यासाठी उळुंबचे स्वतंत्र ब्रँडिंग करून होम स्टे व ॲग्रो टुरिझमला मदत करावी. धरणग्रस्तांना बोट क्लबची परवानगी देण्याबाबत पावले उचलावीत.
महसूल व दाखले: सातबारा दुरुस्तीबाबत लोक अदालती घ्याव्यात. पुनर्वसितांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून जमिनीचे वाटप व दाखल्यांचे वितरण करण्यासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांनी विशेष कॅम्प घ्यावेत. अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी.
आरोग्य व रेशन: मालकपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला नवीन ॲम्बुलन्स उपलब्ध करून द्यावी. तसेच, गावातील प्रत्येक कुटुंबाकडे रेशनिंग कार्ड असण्यासाठी आणि 'ॲग्रीस्टॅक' योजनेतील सहभागासाठी विशेष कॅम्प लावण्यात यावेत.
शासकीय यंत्रणांची प्रत्यक्ष पाहणी
या दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ चर्चा न करता गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रास्त धान्य दुकान (रेशन दुकान) यांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील कामकाजाची व शासकीय योजनांची पाहणी केली.
या महत्त्वपूर्ण ग्राम दौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांसोबत प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री. बोडके, स्थानिक पोलीस पाटील आणि विविध विभागांचे अधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



