दुर्गम भागातील ग्रामस्थांचे तेज आणि हास्य ओरिजनल; 'सर्वोदय'चे अध्यक्ष संजय जेधे-देशमुख यांचे प्रतिपादन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
अखंड समाजसेवेचा ध्यास घेतलेल्या वाई तालुक्यातील आघाडीच्या 'सर्वोदय सेवा ट्रस्ट' या सामाजिक संस्थेच्या वतीने वाईच्या पश्चिम भागातील 'जोर' या दुर्गम गावी एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. संस्थेच्या वतीने 'घर तेथे झाड' या अभियानांतर्गत गावातील प्रत्येक घरोघरी तब्बल १५० केसर आंब्यांच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमादरम्यान सर्वोदय सेवा ट्रस्टचे अध्यक्ष संजय जेधे-देशमुख यांनी जोरच्या ग्रामस्थांशी अत्यंत भावनिक आणि जिव्हाळ्याचा संवाद साधला. ग्रामस्थांचे कौतुक करताना ते म्हणाले, "आम्ही तुम्हाला गोड फळ देणारी झाडे देत आहोत, परंतु तुम्ही माणसे त्याहूनही गोड आहात. आजच्या भूलभुलैयाच्या जगापासून दूर, डोंगर-कपारीत आणि जंगलाने वेढलेल्या भागात राहूनही तुमच्या चेहऱ्यावरचे तेज आणि हास्य ओरिजनल आहे. आजकालच्या शहरांमधील विविध रंगांनी पॉलिश केलेल्या आणि ओढून-ताणून हास्य आणणाऱ्या समाजाला तुमचे हे साधेपण म्हणजे एक चपराक आहे."
पुढे बोलताना जेधे-देशमुख म्हणाले, "आजही तुमच्या अंगावर फाटका सदरा असला, तरी तुमची मने एकमेकांशी प्रेमाने जोडलेली आहेत. हा जिव्हाळा आजकालच्या शहरी व उच्चशिक्षित समाजात पैशाच्या मागे धावताना हरवत चालला आहे. तुम्हाला बघून असे वाटते की, आजकालचे 'श्रीमंत रोग' तुम्हाला झालेले नाहीत आणि ते होऊही नयेत. सर्वांना निरोगी व आनंदी आयुष्य लाभावे. ग्रामस्थांनी निर्व्यसनी राहून मुलांना उच्चशिक्षण द्यावे, यासाठी सर्वोदय ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही नक्कीच सर्वतोपरी मदत करू," असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
विविध सामाजिक उपक्रमांची माहिती
कार्यक्रमात सर्वोदयचे उपाध्यक्ष प्रकाश वाडकर सर यांनी संस्थेच्या वतीने राबवल्या जाणाऱ्या शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि विविध सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. तसेच सचिव संतोष वाडकर सर, संचालक आनंद गायकवाड सर, गोळेवाडी गावचे माजी सरपंच सुनील गोळे, आणि दहयाट गावचे माजी सरपंच व संचालक शिवाजी धनावडे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
वृक्षारोपण आणि निसर्गाचा आनंद
जोर गावचे सरपंच नारायण सपकाळ यांच्या उपस्थितीत काही रोपांचे प्रत्यक्ष रोपण करून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. वृक्षवाटपाच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी, सकाळी सर्वोदयच्या ३० सभासदांनी परिसरामध्ये जंगल सफारीचा आनंद घेतला आणि स्थानिक रानमेव्याचा आस्वाद घेतला.
या प्रसंगी सर्वोदयचे खजिनदार ज्ञानदेव वाशिवले सर, संचालक किशोर महागडे, नितीन शिंदे, विजय वाडकर सर, मारुती फणसे, बापू फणसे, अशोक मराठे, पत्रकार पि. एस. भिलारे, रामदास राऊत, नवीन कांबळे, राजेंद्र महागडे, माणिक बनसोडे, दत्ता मांढरे यांच्यासह जोर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच स्तरांतून सर्वोदय सेवा ट्रस्टचे कौतुक होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



