संस्थापकांसह अनेक युवकांचे उत्स्फूर्त रक्तदान!
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
जागतिक रक्तदान दिनानिमित्त वाई येथील दिशा ज्युनिअर कॉलेजच्या वतीने आयोजित करण्यात आलेले रक्तदान शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरित्या पार पडले. या शिबिराला स्थानिक नागरिक, युवक-युवती, माजी विद्यार्थी आणि पालकांचा अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सातारा येथील बालाजी ब्लड बँकेच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गरजू रुग्णांना वेळेत रक्त मिळून जीवनदान मिळावे आणि समाजात रक्तदानाविषयी सकारात्मक जनजागृती व्हावी, या पवित्र उद्देशाने महाविद्यालयाने या उपक्रमाचे पाऊल उचलले होते.
या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे दिशा ज्युनिअर कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम आणि संचालिका प्रा. रूपाली कदम यांनी स्वतः रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कृतीने उपस्थितांचा उत्साह द्विगुणित केला. प्रेरणा घेऊन परिसरातील अनेक तरुण-तरुणींनी आयुष्यात प्रथमच रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली.
"रक्तदान हे केवळ दान नसून एखाद्या व्यक्तीला नवजीवन देण्याचे महान कार्य आहे. रक्ताला कोणताही कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्यामुळे प्रत्येक निरोगी व्यक्तीने नियमित रक्तदान करणे काळाची गरज आहे. युवकांनी आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून अशा उपक्रमांत पुढे यावे. एकाचे रक्तदान अनेकांचे प्राण वाचवू शकते आणि हीच खरी मानवसेवा आहे," असे प्रा. डॉ. नितीन कदम (संस्थापक अध्यक्ष, दिशा ज्युनिअर कॉलेज) यावेळी म्हणाले.
शिबिराच्या यशस्वीतेसाठी दिशा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ताजुद्दीन सय्यद, ॲडमिनिस्ट्रेटर सारिका चव्हाण आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. रक्तदात्यांची नोंदणी, त्यांना योग्य मार्गदर्शन आणि उत्तम व्यवस्थापन यामुळे शिबिर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना समाजसेवेचे आणि सामाजिक बांधिलकीचे व्यावहारिक धडे देणाऱ्या दिशा ज्युनिअर कॉलेजच्या या स्तुत्य उपक्रमाचे वाई परिसर आणि सर्व स्तरांतून भरभरून कौतुक होत आहे. 'रक्तदानाच्या माध्यमातून मानवतेची सेवा' हा संदेश देणारे हे शिबिर कमालीचे यशस्वी ठरले असून, भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



