शाश्वत विकासासाठी वैयक्तिक जबाबदारी अत्यावश्यक - डॉ. मंगेश कश्यप

वाई वसंत व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प

The third flower of the Y Vasant lecture series, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)

वाई वसंत व्याख्यानमालेच्या तिसऱ्या पुष्पात “शाश्वत विकास आणि तुम्ही आम्ही” या विषयावर डॉ. मंगेश कश्यप यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नितीन कदम होते.

डॉ. मंगेश कश्यप यांनी आपल्या व्याख्यानात शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर सखोल विवेचन करत सांगितले की, “आपल्याला निसर्गाकडून सतत घेण्याची सवय लागली आहे - नदीकडून पाणी, झाडांकडून फळे,मात्र त्याला काही परत देण्याची सवय आपल्यात नाही. ‘भारत माझा देश आहे’ ही भावना केवळ घोषणांपुरती मर्यादित राहिली असून ती कृतीतून दिसणे आवश्यक आहे. अमेरिका, भारत, चीन हे सर्व भूप्रदेश एकत्र आले की विश्व तयार होते आणि हे संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे, हा संत ज्ञानेश्वरांचा विचार आजही तितकाच महत्त्वाचा आहे. 

संविधानाने दिलेल्या हक्कांसाठी आपण झगडतो, मात्र त्याच संविधानाने दिलेल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करतो. पर्यावरणासंदर्भातील अनेक कायदे जर काटेकोरपणे लागू केले, तर आपल्या दैनंदिन जीवनातील अनेक कृतींवर दंड होऊ शकतो, हे लक्षात येईल. राष्ट्रप्रेम मोठ्या घोषणांमध्ये नव्हे, तर छोट्या कृतींमध्ये दिसले पाहिजे. स्वच्छता म्हणजेच समृद्धी असून नद्यांमध्ये आपण टाकत असलेले प्रदूषण पुन्हा आपल्या घरातच परत येते. कृष्णा नदीसारख्या जीवनदायिनी नदीचे पाणीही प्रदूषित झाले आहे; उद्या त्यात रासायनिक बिघाड झाला, तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतील. 

विकासाच्या नावाखाली निसर्गाची होणारी हानी थांबवली पाहिजे. आजचे शिक्षण राष्ट्रीय चारित्र्य घडवण्यात अपयशी ठरत असून ते केवळ वैयक्तिक प्रगतीपुरते मर्यादित झाले आहे. जीडीपीच्या स्पर्धेत पुढे जाण्याचा प्रयत्न होत असला, तरी हवा आणि पाणी दूषित असेल, तर त्या प्रगतीचा उपयोग नाही. शाश्वत विकासात सर्वप्रथम आरोग्य महत्त्वाचे आहे, नैसर्गिक, राष्ट्रीय, शहरी आणि वैयक्तिक या सर्व स्तरांवर. शिक्षणाचे उद्दिष्ट ‘प्रज्ञा’ निर्माण करणे असावे, म्हणजे योग्य-अयोग्य ओळखण्याची क्षमता विकसित होणे. आज आपण माहिती घेतो, पण ज्ञान निर्माण करत नाही. तंत्रज्ञानाची क्रांती मोठ्या प्रमाणावर झाली आहे. तंत्रज्ञान आवश्यक असले, तरी त्याचा अतिरेक धोकादायक आहे. आज लहान मुलांनाही तंत्रज्ञान सहज अवगत आहे, मात्र त्याच वेळी त्यांची विचारशक्ती आणि शारीरिक हालचाल कमी होत आहे. मैदानावरील खेळ नाहीसे होत असून ‘फोन-ग्रस्त’ पिढी तयार होत आहे. आई-वडीलही त्याच सवयींचे असल्याने ही परिस्थिती अधिक गंभीर होते. 

शिक्षणव्यवस्थेत पालक, शिक्षक आणि विद्यार्थी हे तीनही स्तंभ दुर्लक्ष करत आहेत. अनुभवातून शिक्षण घेण्याची प्रक्रिया कमी झाली आहे. पालक स्वतः मुलांचे कार्य पूर्ण करतात, त्यामुळे मुलांना प्रत्यक्ष अनुभव मिळत नाही. पुढील पिढी घडवायची असेल, तर पालकांनी स्वतः वाचनाची सवय लावली पाहिजे. सोशल मीडियावर उपलब्ध माहितीला ज्ञान समजण्याची चूक होत आहे; व्हॉट्सअॅपसारखे माध्यम ‘युनिव्हर्सिटी’ बनले आहे. आज समाजात मूल्यव्यवस्थेचा बदल दिसून येतो. बारावी नापास व्यक्ती सोशल मीडियावर प्रसिद्धी आणि पैसा कमावते, तर शिक्षित युवक बेरोजगार राहतो. त्यामुळे ‘शिक्षणाचा उपयोग नाही’ असा चुकीचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचतो आणि त्याच दिशेने त्यांचे आदर्श तयार होतात. 

शहरविकासाच्या संदर्भात ‘इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजेच विकास’ ही चुकीची समजूत आहे. विवेकबुद्धीने निसर्गाचा वापर करणे म्हणजे विकास. आज तळी बुजवली जात आहेत, जंगलांची तोड होत आहे आणि त्याच वेळी ‘स्मार्ट सिटी’ची संकल्पना मांडली जाते. संत ज्ञानेश्वरांनी ‘नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी’ हा विचार पूर्वीच दिला आहे. विकासाच्या नावाखाली शहरे दबली जात आहेत आणि गावे चुकत चालली आहेत.

पर्यावरण संवर्धनासाठी झाडांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मोठी झाडे कार्बन साठवून तापमान कमी करतात. प्रत्येकाने आपल्या जीवनातील प्रसंगांशी निगडित झाडे लावण्याची सवय लावली, तर मोठा बदल घडू शकतो. पूर्वी वाड्यांच्या परसात झाडे असायची आणि सांडपाणी नैसर्गिकरित्या शुद्ध होत असे; आज ती व्यवस्था नाहीशी झाली आहे. जगभरात शाश्वत विकासासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत शहरी शेती, विज्ञान उद्याने, नदी संग्रहालये. मात्र आपल्या देशात नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही तिचे संवर्धन होत नाही. २०१५ मध्ये शाश्वत विकासासाठी १७ उद्दिष्टे ठरवली गेली, मात्र त्याकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही.

शाश्वत विकास हा ‘ह्युमन सेंट्रिक’ असतो. आपल्या गरजा (Need) आणि हव्यास (Want) यातील फरक ओळखणे आवश्यक आहे. कापडी पिशवी वापरणे, प्लास्टिक टाळणे, पाण्याची बचत करणे अशा छोट्या सवयींमधून मोठा बदल घडू शकतो. पुढील पिढीसाठी नैसर्गिक साधनसंपत्ती जपणे ही आपली जबाबदारी आहे. भविष्यात पाण्यासारख्या मूलभूत संसाधनांवरही कॉर्पोरेट नियंत्रण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाज या सर्व स्तरांवर शाश्वत विकासाची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे.”

प्रास्ताविक विशाल कानडे यांनी केले, तर योगिनी गोखले यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ. कश्यप व डॉ नितीन कदम यांचा सत्कार संचालक आनंद शेलार केला. सुत्रसंचलन व आभार मोहन खरे यांनी मानले. कार्यक्रमाचे प्रायोजक मंदाकिनी शामराव कुलकर्णी व अंजली अनंत भागवत यांचा सत्कार मंगेश कश्यप यांनी केला. व्याख्यानाला वाईकरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !