काळा बाजारीवर पुरवठा विभागाची मोठी कारवाई
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गरिबांसाठी येणाऱ्या गहू आणि तांदळाचा बेकायदेशीर साठा साठवून ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात हा साठा जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे रेशन माफियांचे धाबे दणाणले आहेत.
रविवार २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ च्या सुमारास पुरवठा निरीक्षक साहिला नायकवडे यांना वाखण रोड येथील एका शेडमध्ये रेशनच्या धान्याचा मोठा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नायकवडे यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वाखण रोडवरील एका बंद शेडमध्ये पथकाने तपासणी केली. शेड उघडल्यानंतर तिथे प्लास्टिकच्या गोण्यांमध्ये भरलेला गहू आणि तांदळाचा मोठा साठा आढळून आला. ज्या व्यक्तीने हे शेड भाड्याने दिले होते, त्याला तातडीने पाचारण करण्यात आले. या प्रकरणी रमेश पाटणे नावाच्या व्यक्तीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
पुरवठा विभागाने हा सर्व धान्य साठा जप्त केला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. हे धान्य नेमक्या कोणत्या दुकानदाराने दिले किंवा कुठून आले, याबाबत संबंधित व्यक्तीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. या रॅकेटमध्ये मोठे मासे अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून पोलीस आणि प्रशासन अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, "आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आम्ही वाखण रोडवरील शेडची तपासणी केली, तिथे रेशनचा धान्य साठा मिळून आला आहे. हा साठा जप्त केला असून शासन स्तरावर पुढील कारवाई सुरू आहे." असे साहिला नायकवडे, पुरवठा निरीक्षक यांनी सांगितले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




