क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक विषमतेविरोधात लढण्याची प्रेरणा देईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन

Savitribai Phule jayanti, chief minister Devendra fadnavis, , Naigaon, Khandala, Satara, Maharashtra, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव येथे उभ्या राहणारे उचित स्मारक हे त्यांच्या कार्याची आठवण देईल, त्यामुळे लढण्याची प्रेरणा तर मिळेलच परंतु समाजातील विषमतेच्या विरोधात क्रांतीची बिजे तयार होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महिलांना अधिकारिता देण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी येथे उभ्या राहणाऱ्या महिला प्रशिक्षण केंद्रात आवश्यक सर्व प्रकारच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

नायगाव (ता. खंडाळा) येथे आयोजित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या १४३ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन तसेच महिला प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, सचिन पाटील, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, नायगावच्या सरपंच स्वाती जमदाडे आदी उपस्थित होते.

महाराष्ट्रात आणि देशात स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, स्त्रीयांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य समजतो, अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अनिष्ट रुढीवादाच्या विरोधात क्रांतीचे रणशिंग फुंकले आणि समाजामध्ये समता तयार करण्याकरता एक मोठी व्यवस्था उभी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या समाजात जेव्हा जेव्हा रूढीवाद, विषमता, जातिवाद वाढला त्या त्यावेळी आपण सामाजिक आर्थिक गुलामगिरीत गेलो. अशा जातीपातीत विभागलेल्या समाजात उच्च- नीच पणाची भावना रुजविण्याचा प्रयत्न  होता. अशा परिस्थितीत सर्वाधिक वाईट स्थिती महिलांची होते. कुठल्याही समाजातील महिलांना अत्यंत हीन प्रकारची वागणूक देण्याची रूढी होती. शिक्षणाचा अधिकार नव्हता, विधवांना संपत्तीचा अधिकार नव्हता. अशा स्थितीत त्यांनी समाजातील रुढींच्या विरोधात बंड पुकारले आणि महिलांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी पहिली मुलींची शाळा सुरू केली. 

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, हे शासन महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या मार्गाने चालण्याचे काम करेल, त्यामुळेच आम्ही मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याच्या योजनेला सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले.  महात्मा फुले यांनी समाजाला मोकळा श्वास देण्याचे काम केले.  त्या अनुषंगाने मोफत उपचार देण्याच्या जन आरोग्य योजनेला महात्मा फुले यांचे नाव दिले, असेही ते म्हणाले.

शासनाने लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी न ठेवता लखपती दिदी बनविण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार आतापर्यंत ५० लाख लखपती दीदी झाल्या असून यावर्षी १ कोटीपर्यंत पोहोचू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यात दीड लाख लखपती दीदी झाल्या आहेत याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.

संत सावता माळी यांचे अरण येथील स्मारकही भव्य दिव्य करण्यात येईल. त्यासाठी आवश्यक त्या व्यवस्था उभ्या करण्यात येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

नायगावचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या नावाने करण्याची मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्या अनुषंगाने ग्रामसभेने तसा निर्णय घेऊन ग्राम विकास विभागामार्फत पाठवल्यास त्याला विनाविलंब मान्यता देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ म्हणाले, १९९३ साली नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या जन्म झालेल्या वाड्याचा शोध घेतला. त्याचा शेजारील घरांप्रमाणे विकास व्हावा म्हणून वास्तुविशारद शोधून काम केले. त्यावेळी निधीची उभारणी करून घर आणि स्मारक उभे राहिले. त्यावेळी पंचवीस - तीस लाख उभे करण्याला अडचण येत होती. पण आज मुख्यमंत्र्यांनी १४३ कोटी रुपये दिले, त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. पुण्याच्या फुले वडाच्या रेंगाळलेल्या कामाला गती देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. 

११ एप्रिल २०२७ ला महात्मा फुलें यांची २०० वी जयंती असून ती देशभर साजरी करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने राज्यातही साजरी करत असतानाच मुंबई येथे कलिना येथे इंडिया बुल्सच्या मागे एक आंतरराष्ट्रीय ग्रंथालय उभे करण्याचे यापूर्वी निश्चित केले होते. त्या अनुषंगाने इमारत उभी राहिली असून ग्रंथालयाचे कामही व्हावे, असेही त्यांनी नमूद केले.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सावित्रीबाई फुले यांचे भव्य दिव्य स्मारक उभे राहावे या अनुषंगाने गतीने पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी १४३ कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता दिली असून ११० कोटी मंजूर झाले आहेत. येथील महिला प्रशिक्षण केंद्रासाठी अजून ५० कोटी रुपयांची गरज आहे. तसेच शेजारील पर्यटन विभागाची २ एकर जागाही या कामासाठी हस्तांतरित होणे आवश्यक असल्याचे, ते म्हणाले.

महात्मा फुले यांचे मूळ  गाव कटगुण येथेही छोटे स्मारक असून तेथे ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून त्यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेत आहोत, असेही ते म्हणाले. 

मंत्री मकरंद पाटील म्हणाले, सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांचे कार्य आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही. त्या काळी समाजामध्ये प्रचंड दरी, शिक्षणाचा अभाव, अज्ञान, भेदभाव, अनिष्ट रूढी असताना त्यांनी १९४८  साली पहिली मुलींची शाळा सुरू करून क्रांती केली. नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांच्या १४३ कोटी रुपयांच्या स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते होत आहे याचा आनंद होत आहे. ग्रामीण महाराष्ट्रात क्रांतिज्योतींच्या नावाला साजेसे शैक्षणिक संकुल येथे उभे राहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांसह अन्य मान्यवरांनी महिला स्वयंसहाय्यता समुहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शन व विक्री दालनांना भेट दिली. 

कार्यक्रमात नियोजित सावित्रीबाई फुले स्मारक संकल्पन चित्रफीत दाखविण्यात आली. प्रास्ताविक सरपंच स्वाती जमदाडे यांनी केले.

कार्यक्रमाला माजी आमदार राम सातपुते, बळीराम सीरस्कार, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी उपस्थित होते.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !