ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तेजस्वी वैज्ञानिक अविष्कार...!
शिवशाही वृत्तसेवा, शिरुर ( प्रतिनिधी फैजल पठाण )
तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेत गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी या शैक्षणिक वर्षातील विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे संचालक महेश ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हे विज्ञान प्रदर्शन यंदाचे खास आकर्षण ठरले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला निरीक्षण शक्तीला आणि मेहनतीला सुंदर आकार देत एकापेक्षा एक उत्तम प्रयोगाचे सादरीकरण केले.
सर्वप्रथम या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे, पर्यवेक्षक मोहन ओमासे, विज्ञान विषय प्रमुख अर्चना गोरे ,रवींद्र सातपुते प्रशालेच्या प्रकाशन विभाग प्रमुख हर्षाली भोईटे यांच्या उपस्थितीत करण्यात आले यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रत्येक प्रकल्पातून उभारून दिसणारी विद्यार्थ्यांची जिद्द आणि वैज्ञानिक दृष्टिकोन पाहून सर्व मान्यवर भारावून गेले. सर्व मान्यवरांनी प्रत्येक प्रयोगाचे निरीक्षण केले व त्याबद्दल माहिती घेतली. या प्रदर्शनात जलशुद्धीकरण, सौर ऊर्जा, पीकसंवर्धनातील नवीन तंत्रे, पर्यावरण संरक्षण, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स व दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी मांडले होते.
विद्यार्थिनींनी सुंदर अशा वैज्ञानिक रांगोळ्या ही साकारल्या होत्या. यामध्ये हृदयाची रचना, श्वसन संस्था, व्यसनमुक्ती वर आधारित रांगोळ्या काढून एक प्रकारे विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याचे कामही केले. जवळपास 150 प्रयोगांची मांडणी यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केली होती हे विज्ञान प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील विविध शाळांनी व पालकांनीही भेटी दिल्या यामध्ये आनंद आश्रम शाळा, रेनबो इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांचा प्रामुख्याने समावेश होता.
दुपार सत्रात विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषेचा कार्यक्रमही आयोजित केला होता यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन विज्ञान विषयातील विविध प्रश्नांची उत्तरे देऊन आपली विज्ञान विषया बद्दलची आवड व त्यांना माहिती असलेल्या सखोल ज्ञानाचे प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विज्ञान विषय प्रमुख अर्चना गोरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे उपशिक्षक गौतम जाधव यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार सुरेंद्र ठुबे यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे चे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर ,उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, मानद सचिव अरविंद ढमढेरे, ज्येष्ठ संचालक विजय ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे यांनी सदिच्छा व शुभेच्छा दिल्या.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














