मदन भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ स्वीकारून अनिल सावंत अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून या निवडणुकीत भाजपचे अनिल सावंत हे जनतेतून नगराध्यक्ष पदी निवडून आलेले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. नितीन कदम यांचा २१६० मतांनी पराभव केला. नगराध्यक्ष पदभार समारंभाअगोदर अनिल सावंत यांनी शहरातून भव्य आणि जल्लोषपूर्ण रॅली काढण्यात आली. यावेळी ढोल-ताशे, फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून अनिल सावंत यांचे स्वागत केले. रॅलीनंतर वाई नगरपालिकेत अधिकृत पदग्रहण समारंभ पार पडला. या समारंभात भाजपचे जेष्ठ नेते मदन भोसले, यांनी नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत अनिल सावंत यांना बसवून शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी शेखर शिंदे, काशिनाथ शेलार, ॲड.जगदीश पाटणे, जितेंद्र पिसाळ, नूतन भाजपचे नगरसेवक यामध्ये अपर्णा संतोष जमदाडे, प्रसाद बनकर, पदमा जाधव, ज्योती सचिन गांधी, जागृती मकरंद पोरे, विजय ढेकाणे, केतकी मोरे, संग्राम सपकाळ, दिपाली सावंत, नूतन मालुसरे, तर राष्ट्रवादीचे भारत खामकर, अजित शिंदे, संग्राम पवार, घनशाम चक्के, संदीप जावळे, नीलिमा खरात, डॉ. जीविता जमदाडे, शारदा काळे, शैलेन्द्र देवकुळे, पद्मश्री चोरगे, रेखा जाधव, गुरुप्रसाद चव्हाण, अपक्ष नगरसेवक सुशील खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासनाच्या वतीने नगराध्यक्ष व सर्वच नगरसेवक यांचा मुख्याधिकारी संजीवनी दळवी व नारायण गोसावी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.
भाजपचे जेष्ठ नेते मदन भोसले यावेळी बोलताना म्हणाले, वाई नगरपालिका लवकरच “ब” वर्गात रुपांतर करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येणार असून प्रशासनाने याकामी सहकार्य करावे, वाई शहरातील प्रलंबित असणारे प्रश्न मार्गी लावण्याचा अजेन्ठा राबविण्यात येणार आहे. तरी निवडून आलेल्या सर्व सदस्यांनी वाई शहरातील प्रलंबित प्रश्नांचा पाठपुरावा करावा.
शपथविधीनंतर बोलताना नगराध्यक्ष अनिल सावंत म्हणाले, वाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, नागरी सुविधा आणि पारदर्शक कारभाराला प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या पदग्रहण समारंभाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला
पदग्रहण समारंभास गोंधळाचे गालबोट
वाई नगरपालिकेच्या छ. शिवाजी महाराज सभागृहात पदग्रहण समारंभ पार पडला. मात्र प्रशासनाने नगराध्यक्ष व सर्वच नगरसेवक यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहात आले असता त्यांना बसण्यासाठी आसन उपलब्ध नसल्याने माजी नगराध्यक्षा नीलिमा खरात, भारत खामकर व सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात करीत मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांना धारेवर धरले. परंतु नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी मध्यस्थी करीत प्रकरण शांत करीत सर्वांसाठी आसन उपलब्ध केले. व शांततेत सन्मान समारंभ पार पडला
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



