शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल परदेशी कुटुंबियांचा गौरव
कुस्ती क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल पैलवान मंगलसिंग गणपती परदेशी यांना मरणोत्तर राष्ट्रीय खलिपा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. आज, १७ डिसेंबर २०२५ रोजी वाई येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पैलवान मंगलसिंग परदेशी यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळाच्या संवर्धनासाठी आणि नवीन खेळाडू घडवण्यासाठी समर्पित केले होते. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार जाहीर झाला होता.
हा सन्मान पैलवान मंगलसिंग परदेशी यांच्या पत्नी मीरा मंगलसिंग परदेशी आणि संपूर्ण परदेशी कुटुंबियांनी अत्यंत भावूक वातावरणात स्वीकारला. यावेळी उपस्थितांनी मंगलसिंग परदेशी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याप्रती आदर व्यक्त केला.
या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संपतराव जाधव होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी मंगलसिंग यांच्या खेळाप्रती असलेल्या निष्ठेचे कौतुक केले. याप्रसंगी पैलवान प्रतापसिंह पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी कुस्ती क्षेत्रातील परदेशी घराण्याच्या योगदानाचा उल्लेख करत, हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला परदेशी कुटुंबातील सदस्य, कुस्ती क्षेत्रातील खेळाडू आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्कारामुळे संपूर्ण परिसरातून परदेशी कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














