अनियमित बस सेवेमुळे प्रवाशांचे हाल
शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( प्रतिनिधी शुभम कोदे )
पुणे-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर आणि निसर्गरम्य पश्चिम भागात असलेल्या खंडाळा तालुक्यातील अनेक गावांमधील नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बस सेवेच्या अनियमित आणि अपुऱ्या वेळापत्रकामुळे प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः या भागातील विद्यार्थ्यांचे आणि नोकरदार वर्गाचे यामुळे मोठे हाल होत आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागातील, डोंगरपायथ्याशी असलेल्या गावांमध्ये एसटीच्या फेऱ्या अत्यंत कमी आहेत.
काही गावांमध्ये दिवसातून केवळ एक किंवा दोन फेऱ्या उपलब्ध आहेत. तर काही गावांमध्ये एसटीच जात नाही. एसटी वेळेवर येत नसल्यामुळे किंवा ठरलेल्या वेळेत अचानक बदल केल्यामुळे प्रवाशांना तासन् तास बसस्थानकावर वाट पाहावी लागते. यामुळे नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. पश्चिम भागातील अनेक खेडी ही दुर्गम असल्याने, एसटी हेच सार्वजनिक वाहतुकीचे एकमेव विश्वसनीय आणि स्वस्त साधन आहे.
एसटीच्या बोजवारामुळे खासगी वाहतुकीचा सहारा घ्यावा लागतो, जो सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा नाही. वेळेवर बस न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शाळा, महाविद्यालयांमध्ये वेळेत पोहोचणे शक्य होत नाही. याचा थेट परिणाम त्यांच्या उपस्थितीवर आणि शिक्षणावर होत आहे. प्रवाशांनी व लोकप्रतिनिधींनी अनेकदा एसटी महामंडळाकडे याबद्दल तक्रारी केल्या आहेत, परंतु परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. विद्यार्थ्यांच्या वेळेनुसार आणि प्रमुख कार्यालयीन वेळेनुसार फेऱ्यांची संख्या तातडीने वाढवण्यात यावी,
निश्चित केलेल्या वेळापत्रकाचे एसटी कर्मचाऱ्यांनी काटेकोरपणे पालन करावे, जेथे एसटी सेवा पोहोचत नाही, अशा गावांपर्यंत नवीन बस मार्ग सुरू करावेत.
या समस्येकडे एसटी महामंडळाने त्वरित लक्ष देऊन पश्चिम भागातील नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या समस्येवर तातडीने तोडगा न निघाल्यास आंदोलनाचा इशारा पश्चिम भागातील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी दिला आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














