पद्मभूषण कै. आबासाहेब तथा भालचंद्र गरवारे यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पद्मभूषण कै.आबासाहेब तथा भालचंद्र गरवारे यांच्या १२३ व्या जयंतीचे औचित्य साधून 'गरवारे टेक्निकल फायबर्स' कंपनीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३०५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. कंपनीच्या सामाजिक बांधिलकीच्या परंपरेनुसार दरवर्षी या शिबिराचे आयोजन केले जाते, मात्र यावर्षी विक्रमी प्रतिसाद पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते कै.आबासाहेब गरवारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, अभिजीत जोशी, जनरल मॅनेजर सचिन कुलकर्णी, चंद्रशेखर बदाने, मॅनेजर अंशुमन जगदाळे, सुनील पानसे, अविनाश भोसले आणि बालाजी रक्तपेढीचे चेअरमन महेशकुमार भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
याप्रसंगी कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय म्हस्के आणि सचिव अर्जुन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातारा येथील बालाजी रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबीर पार पडले. यंदाच्या शिबिराचे खास वैशिष्ट्य म्हणजे पहिल्यांदाच ३०५ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. या महान कार्याबद्दल प्रत्येक रक्तदात्याला कंपनीच्या वतीने प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी नियोजनासाठी अविनाश भोसले, कुमार पवार आणि आकाश धनवे यांनी विशेष परिश्रम घेतले. कंपनीतील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते. कै. आबासाहेब गरवारे यांच्या जयंतीनिमित्त राबवण्यात आलेल्या या विधायक उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



