साडेचार तोळ्याचे २,१३,२०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच ३५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
वहागाव तालुका वाई येथे सोमवार दि. ८ रोजी भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. यामध्ये सुमारे साडेचार तोळ्याचे २,१३,२०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने तसेच ३५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली आहे . भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे वहागावसह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अधिक माहिती अशी की, नंदकुमार निंबाळकर यांची वहागांव येथे आल्याची शेती असून सोमवारी त्यांच्या शेतामध्ये खुरपणी करण्यासाठी मजुर असल्याने ते सकाळी दहा वाजता घराला कुलूप लावून शेतात गेले होते. तसेच त्यांच्या पत्नी सातारा येथे कामानिमित्त गेल्या होत्या. नंदकुमार निंबाळकर हे दुपारी जेवण करण्यासाठी शेता मधून घरी आले असता घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ झालेल्या घटनेची माहिती भुईंज पोलिसांना दिली. माहिती मिळताच वाई येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी आपल्या सहकार्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली.
चोरट्यांनी घराबाहेर असलेला लोखंडी गेटचा कोयंडा तसेच दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन बेडरुममध्ये असलेल्या कपाटाचे लॉकर उचकटून त्यामध्ये असलेले साडेचार तोळ्याचे सोन्याचे दागिने व 35 हजारांची रोकड लांबविली. यामध्ये 80 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दोन वाट्या असलेले मंगळसूत्र, 24 हजार रुपये किंमतीची 6 ग्रॅम वजनाची आणि 48 हजार रुपये किंमतीची 12 ग्रॅम वजनाची गळ्यातील चेन, 12 हजार रुपये किंमतीची 3 ग्रॅम वजनाची अंगठी, 14 हजार रुपये किंमतीचे साडेतीन ग्रॅमचे पेडेंट असे सोन्याचे दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय चोरट्यांनी कपाटात ठेवली 35 हजार रुपयांची रोकडही लंपास केली आहे.
या चोरीप्रकरणी नंदकुमार संतराम निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भुईंज पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे करत आहेत.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














