भैरवनाथ विद्यालय पळवे खुर्द माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. विद्यालायची तर गोष्टच काही औरच असते. याचा प्रत्यय रविवारी श्री भैरवनाथ विद्यालय पळवे खुर्द ता पारनेर जि अहिल्यानगर येथे दि. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास 25 वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना उजाळा दिला.
कार्यक्रमाची औपचारिकता सोडून दिल्यास प्रत्येकाच्या मनात एक विश्वास, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम ओतप्रोत भरले गेले. आपल्या शिक्षकांप्रती असलेला आदराचा सुगंध सगळीकडे पसरला होता. तसेच एका छानश्या रोपट्याला खतपाणी घालुन त्याची उत्तम वाढ झाल्यावर चेहरयावर ओसंडून वाहणारा अभिमान प्रत्येक शिक्षकांच्या ठायी दिसत होता.
विविध क्षेत्रात कार्यरत असलेले विद्यार्थी या वेळी एकत्र आले. धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला आहे; पण शाळेची आठवण कायम येत असल्याचे प्रत्येकाच्या तोंडून निघाले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री शेळके सर यांनी केले. आजमितीला हयात नसलेल्या मित्रांना व शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून कार्यक्रम पुढे सुरू झाला. या वेळी श्री. जाधव सर, थोरात सर, साळवे सर गायकवाड सर, मधे सर आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यासाठी मुंबई, पुणे, सातारा, बारामती आदी ठिकाणावरून ६० च्यावर माजी विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, विद्यालायचा माजी विद्यार्थी व सध्या शिक्षक म्हणून कार्यरत असणारे श्री चंद्रकांत गट, श्री नवनाथ बारगळ व आशा वाळूंज यांनी केले तसेच प्रास्ताविक आप्पा(सुधीर) ओव्हळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आयोजक श्री भगवंत पवार, वर्षा पाचरणे, गणेश आपटे, संतोष तरटे व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














