भेदभावाची वाढती संस्कृती आणि प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेबाबत व्यक्त केली तीव्र नाराजी
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे सदस्य (सचिव दर्जा) गोरक्ष लोखंडे यांनी नुकताच सातारा जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्ह्यातील वाढत्या अॅट्रॉसिटी प्रकरणे, भेदभावाची वाढती संस्कृती आणि प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
दौऱ्यावेळी साखरवाडी येथील बौद्ध विहार वाद प्रकरणी बौद्ध समाजाच्या बांधवांनी लोखंडे यांची भेट घेऊन घटनाक्रमाची माहिती दिली आणि निवेदन सादर केले. याप्रकरणी लोखंडे यांनी लवकरात लवकर उचित कारवाईचे आश्वासन दिले. तसेच, प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. याचवेळी, सोनके गावातील बौद्ध वस्तीवरील हल्ल्याच्या प्रकरणीही बौद्ध समाजाच्या बांधवांनी त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याची हकीकत सांगितली. लोखंडे यांनी या प्रकरणाकडे तातडीने लक्ष देऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी स्पष्ट केले की, मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी आयोगाची स्थापना झाली असून, या प्रकरणांवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल.
दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांच्यासह चळवळीतील विविध कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ लोखंडे यांना भेटले. या शिष्टमंडळाने साखरवाडी आणि सोनके येथील प्रकरणांबाबत आयोगासोबत सविस्तर चर्चा केली आणि तात्काळ कारवाईची विनंती केली. लोखंडे यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासकीय यंत्रणेला निःपक्षपणे आणि तत्परतेने काम करण्याचे निर्देश दिले.
सातारा जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आयोगाची सक्रिय भूमिका आणि लोखंडे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण ठरला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा