प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरेंना संरक्षण देण्याचीही केली मागणी
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया चे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जिवे मारण्याची मिळालेली धमकी व न्युज १८ लोकमतचे जुन्नर प्रतिनिधी सचिन तोडकर यांचेवर वृत्तांकन करताना झालेल्या हल्ल्याच्या निषेध करत , आरोपींवर कठोर कारवाई करावी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांनी केली आहे.
प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रातून लेखन करताना असे म्हटले होते की, "पाकिस्तान मधील क्रिकेट खेळाडू जसे पाकिस्तानवर प्रेम दाखवतात , तसेच प्रेम बॉलीवूडमधील अभिनेते खान बंधू हे आपल्या देशाबद्दल उपडपणे भारत प्रेम का दाखवत नाही ? आपण देखील भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत , असे खान बंधूंनी देखील देशप्रेम दाखवायला हवं होतं ", असे वृत्त प्रसिद्ध होताच काही अज्ञात इसमांनी निनावी पत्राद्वारे, तू ८ दिवसात माफी माग , अन्यथा तुला गोळीबार करून उडवून देऊ , अशी धमकी दिली आहे.
या धमकीचा राज्य पत्रकार संघाच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत असून, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सिद्धार्थ भोकरे यांना पोलिस संरक्षण देऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे.
न्युज १८ लोकमत चे जुन्नर तालुका प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी जुन्नर तालुक्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी प्रक्रियेमध्ये सुरू असलेल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी विशेष बातमी न्यूज १८ लोकमत वर दाखवली होती . या बातमीत खाजगी एजंटांकडून कामगारांची आर्थिक लूट, मोफत मिळणाऱ्या वस्तूंसाठी पैसे वसूल करणे आणि शिष्यवृत्तीतील भ्रष्टाचाराचे गंभीर प्रकार उघड झाले होते. या बातमीनंतर प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. वाहनाच्या काचा फोडल्या असून, ही गंभीर घटना आहे , हा पत्रकारांवरील हल्ल्याचा गंभीर प्रकार आहे.
या दोन्ही घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे . महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संबंधित हल्लेखोर आणि धमकी देणाऱ्यांवर तातडीने पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी , अशी मागणी ही सुरेश खोसे पाटील यांनी केली असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने या दोन्हीं घटनांच्या विरोधात तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे . न्यूज १८ लोकमतचे पत्रकार सचिन तोडकर यांच्यावर वृत्तांकन करताना झालेला हल्ला म्हणजे पत्रकारांवरील दडपण आणि हिंसाचार कोणत्याही परिस्थितीत स्वीकार्य नाही. असेही खोसे पाटील म्हणाले.
वृत्तपत्रात लेखन करणाऱ्या पत्रकारांचे काम म्हणजे लोकांचे विचार सत्य स्वरूपात मांडून ते उजेडात आणणे , हे प्रमुख आहे . पत्रकारांना धमकावण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत. भारत देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण होणे, अत्यंत महत्त्वाचे आहे.
सुरेश खोसे पाटील
प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा नगर जिल्हा सचिव
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा