वाई वसंत व्याख्यानमालेत गुंफले आठवे पुष्प
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
विनोदी नाटकातील विदूषकाच्या मुखवट्या मागे तत्त्वज्ञाचा चेहरा असतो असे सुप्रसिद्ध चित्रनाट्य दिग्दर्शक, पटकथालेखक व अभिनेते अभीराम भडमकर वाई वसंत व्याख्यानमालेच्या आठव्या पुष्पात 'नाटक, चित्रपट ते कादंबरी सीता' या विषयावर प्रकट मुलाखत देताना म्हणाले. यावेळी टिळक स्मारक संस्थेचे संचालक आदित्य चौंडे मुलाखत घेत होते.
भडमकर म्हणाले, जन्म अकोल्यातला असला तरी माझे बालपण कोल्हापुरात गेले. तेथील कला व साहित्यमय वातावरणामुळे ते कलापूरच वाटले. घायाळ हा पहिला चित्रपट लिहिला आणि लक्षात आले नाटक ही गांभीर्याने करण्याची गोष्ट आहे. नाटकाच्या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभाग नोंदवला. कोणत्याही क्षेत्रात शिक्षण लागते मग अभिनयासाठी का नाही या विचाराने एनएसडी मध्ये प्रवेश घेतला.
तिथे मला संपन्न भारतीय रंगभूमीची ओळख झाली. शरीर व मन लवचिक झाले. जुन्या समजूती मोडून पडल्या व नाटकाचे संस्कार व शिक्षण मिळाले. नाटकासाठी लेखन दिग्दर्शन पासून सेटच्या सुतार कामापर्यंत सारे आले पाहिजे हे तिथे समजले.
मी मालिका लिहीत नाही. मालिकांचे विश्व समजत नाही. मालिकांमध्ये लेखकाला, दिग्दर्शकाला पूर्वीसारखे महत्त्व नाही. टीआरपी वाढवण्यासाठी कथानक वळवावे लागते. रंगमंचावर काहीही नसताना आभास निर्माण करणे म्हणजे नाटक. तांत्रिक गोष्टींचा आधार असतो पण त्यालाही मर्यादा येतात. हे आभास निर्मळ करण्याच्या क्लुप्त्या लावताना दिग्दर्शकाचे कसब दिसते.
आम्ही असतो लाडके या नाटकात विशेष बालकांची पात्रे त्यांनी वटवावीत या हट्ट खातर मी स्वतःच दिग्दर्शन केले. त्यावेळी व्यावसायिक नाटकांत खुल्या कॅटेगरीत तेथील बालकलाकारांना सर्वोत्कृष्ट बालकलाकार हा पुरस्कार मिळाला. बाबा आमटेंचे कौतुक करणारे पत्र आले. राष्ट्रपती भवन हे नाटक करताना वेगळाच अनुभव आला.
कादंबरीकडे मी अपघाताने वळलो. भारतात हिंदू धर्मात सुधारण्याची परंपरा आहे मुस्लिम धर्मात ही प्रथा क्षीण आहे. या परंपरेला प्रश्न करणाऱ्यांची धर्मचिकित्सा धर्म सुधारणा करणाऱ्यांची कथा इन्शाल्ला कादंबरीत लिहिली. आज दृष्टिकोनाचा प्रश्न आहे. पूर्वी मतभेद होते मनभेद नाही. आज विचारांचे लोकशाहीकरण झाले ही चांगली गोष्ट आहे पण जबाबदारीचे भान राहिले नाही.
लॉकडाऊन मध्ये वाल्मिकी रामायण वाचले. ऐकलेल्या पेक्षा वेगळी सीता समजली. वाल्मिकी रामायणात पानापानात दडलेली सीता वेगळी आहे ती अबला नाही ,ती कणखर, प्रश्न विचारणारी, स्वयं निर्णय घेणारी आहे. सीता त्यागाचा प्रसंगही वाल्मिकी रामायणात नाही. तेव्हा सीता शस्त्र नव्हे तर सत्व घेऊन रावणाशी लढली. आजची स्त्री देखील कणखर आणि बुद्धीवादी आहे तीही लढते. ऑपरेशन सिंदूर मधील स्त्रियांच्या कामगिरीने हे स्पष्ट झाले. सीता त्याही काळात होती आजही आहे फक्त संघर्ष बदलतात.
हसत खेळत, पछाडलेला, खबरदार ही विनोदी नाटके लिहिली. समाजातील प्रश्न विनोदातून मांडल्यास अधिक प्रभावी होतो. पुस्तकांमुळे भावविश्व विचारविश्व वाढते विचारांचा परिघ वाढतो. हॉटेलमध्ये पैसे घालवल्यास तेथील एक संध्याकाळ आनंद देते मात्र पुस्तकावर पैसे घालवल्यास ते पुस्तक आयुष्याच्या संध्याकाळी पर्यंत आनंद देते.
भडमकर यांनी विविध नाट्यप्रयोगातील आपले अनुभव प्रेक्षकांना सांगितले. अशोक लोखंडे यांनी परिचय केला तर योगिनी गोखले यांनी आभार मानले. नेत्रतज्ञ डॉ रूपाली अभ्यंकर व गुडमिंटन क्लब वाई हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते. श्रोत्यांनी मुलाखतीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा