लोकमान्य टिळक वसंत व्याख्यानमालेत डॉ.मधुबाला चिंचाळकर यांचे प्रतिपादन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
आज पृथ्वीतलावर होणाऱ्या तापमान वाढ आणि वातावरण बदलातील परिणामांचे प्रतिबिंब अंटार्टिका बेटावरही दिसत आहे. त्याचा दुष्परिणाम तेथील जैविक साखळीवर होत असल्याचे दिसून येते. त्यासाठी भारतीयांनी आपली निसर्गाच्या जवळ जाणारी जीवनशैली जतन करून घन कचऱ्याचा कमीत कमी वापर अथवा पुनर्वापर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत डॉ.मधुबाला चिंचाळकर यांनी येथे व्यक्त केले. लोकमान्य टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेत १४ वे पुष्प गुंफताना त्या ' अद्भुत अंटार्टिका ' या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. सुनील धुमाळ (शिरवळ ) होते.
डॉ.चिंचाळकर यांनी यावेळी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थित श्रोत्यांना अंटार्टिका सफर घडवून आणली. डॉ.चिंचाळकर म्हणल्या, २०१७ मध्ये भारत सरकार मार्फत अंटार्टिका येथे डॉक्टर म्हणून संशोधन मोहिमेवर जाण्याची संधी मिळाली. १९८१ मध्ये ही भारतीय संशोधन मोहीम सुरू झाली.त्या ठिकाणी देशाची भारती आणि मैत्री अशी दोन संशोधन केंद्र आहेत. १९८८ मध्ये डी आर डी ओ ने बांधलेले केंद्र आजही उत्तम स्थितीत आहे. या मोहिमेत संशोधक व लॉजिस्टिक असे २५ सदस्य होते. यामध्ये एकटीच महिला होते. त्याठिकाणी एक वर्षभर वास्तव्य होते. नेहमीचे चाकोरीबद्ध जीवन जगत असताना अद्भुत आणि आश्चर्यकारक अनुभव आयुष्यात येतात. मोहिमेत जाण्यासाठी अतिशय कठोर शारीरिक आणि मानसिक चाचण्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात आठ महिने बाहेर जात येत नाही तसेच समाजजीवनापासून दूर असतो.अंटार्टिका हा खंड पृथ्वीच्या तळाशी असून भारताच्या पाचपट असून आकार मनाने पाचवा क्रमांक लागतो. दक्षिण महासागर हिवाळ्यात गाठतो. अंटार्टिका येथे मार्च ते ऑक्टोबर हिवाळा असतो. याकाळात येथे जाऊन राहणे म्हणजे अंतराळात जाण्यासारखे असते. १९ व्या शतकापर्यंत मानव येथे पोचू शकला नव्हता. मानवाशिवाय आपली सुंदर पृथ्वी कशी असते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अंटार्टिका होय.
सगळ्यात उच्चतम चार हजार मीटर उंचीवर असलेल्या अंटार्टिका वर उन्हाळ्यातील तापमान मायनस पाच ते दहा डिग्री सेल्सिअस असते. ९८ टक्के भूभाग बर्फाळ असल्याने या ठिकाणी पांढरे शुभ्र वाळवंट दिसते.पृथ्वीचे गोड पाणी येथे दडले आहे.हिवाळ्यात ताशी २५० ते ३०० मीटर वेगाने हिम वादळे वाहत असतात. कित्येक आठवडे ही वादळे चालतात.इथे चंद्र, सूर्य, ग्रह व तारे क्षिताजाशी समांतर जात असतात. सूर्य दोन - तीन महिने मध्यरात्री तळपत असतो.प्रत्येक सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी आगळावेगळा प्रकाशकीय रंगांची स्वर्गीय अशी उधळण होत असते. इथे विश्वाच्या निर्माणकर्त्याची क्षणोक्षणी जाणीव तसेच पंच महाभूतांचा साक्षात्कार होतो. साऊथ पोलर कुवा हा पक्षी येथील जैविक सृष्टीचा भाग आहे. आज वातावरणातील वाढत्या तापमानामुळे ओझोन थर पातळ होत चालल्याने त्याचा वाईट परिणाम अंटार्टिका बेटावरही होत असल्याचे दिसत आहे. येथील अर्धा डिग्री तापमान वाढत असल्याने कित्येक लाख टन बर्फ वितळत चालला असून त्याचे पाणी समुद्रात वाहत येत आहे. गेल्या पंचवीस वर्षात येथील पेंग्विन पक्षांची संख्या 50 टक्क्याने कमी झाली आहे तर अल्ट्रा व्हायरल किरणामुळे सील्स आंधळे बनत चालले आहेत.त्यास सर्वस्वी मानवजात जबाबदार असून मानवाने आपली जीवनशैली बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.
डॉ. धुमाळ यांनी अध्यक्षीय समारोपात आपले अनुभव कथन केले. प्रारंभी डॉ.मंगला आहिवळे यांनी प्रस्ताविक केले. डॉ.सतीश बाबर यांनी परिचय करुन दिला.वक्तेचा सत्कार कार्याध्यक्षा तनुजा इनामदार यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी वाई आय एम ए मार्फत अध्यक्ष व वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.प्रायोजक गीतांजली मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालिका श्रीमती संजिवनी कद्दु ,राजन पोरे यांचा सत्कार डॉ सौ मधुबाला चिंचाळकर यांचे हस्ते करण्यात आला. डॉ.गजेंद्र पाटील यांनी आभार मानले.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा