संपूर्ण रक्कम यापूर्वीच जमा केली आहे - कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याकडे सन २०२४-२५ मध्ये गळितासाठी आलेल्या उसाचे प्रति टन तीन हजार रुपये प्रमाणे होणारी संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले असून किसान वीर खंडाळा कारखान्याकडे गळीतासाठी आलेल्या उसाच्या दराची संपूर्ण रक्कम यापूर्वीच जमा केली आहे अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
शिंदे यांनी एक प्रसिद्धीस पत्र दिले असून, त्यामध्ये नमूद केल्यानुसार सन 2024-25 मध्ये उसाची उपलब्धता कमी असताना देखील किसनवीर कारखान्याने 3 लाख 92 हजार 904 टन तर खंडाळा कारखान्याने 1 लाख 36 हजार 990 टन उसाचे गाळप केले होते. किसनवीर कारखान्याने प्रति मेट्रिक टन 3000 रुपये ऊस दर जाहीर केला होता. या पोटी 117 कोटी 87 लाख 11 हजार रुपये तर खंडाळा कारखान्याचे 41 कोटी 9 लाख 71 हजार रुपये देणे होते.
ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असून, खंडाळा कारखान्याचे फेब्रुवारी अखेरचे बिल 28 एप्रिल रोजी संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले होते. किसनवीर भुईंज आणि किसनवीर खंडाळा या दोन्ही कारखान्याची एकूण रक्कम 158 कोटी 96 लाख 82 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. किसनवीर कारखान्याची उर्वरित देय रक्कम शुक्रवारी संबंधित ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली आहे.
या दोन्ही कारखान्यांची स्थिती आता भक्कम असल्याने मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळावर ऊस उत्पादकांनी विश्वास ठेवल्याचे सध्या उसाच्या लागवडीच्या नोंदीवरून दिसते. मागील तीन वर्षापेक्षा 2025 26 मधील ऊस लागवडीची नोंद ही सर्वाधिक झालेले आहे असा दावा उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केला.
दरम्यान अजूनही उसाच्या नोंदी सुरू असून सन 2025 26 मध्ये गाळपास येणारा संपूर्ण ऊस शेतकऱ्यांनी किसनवीर व खंडाळा कारखान्यालाच गळीतासाठी पाठवावा असे आवाहन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही.जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा