रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व आपटे प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व सचिव वि. मा. मिरासदार यांचे निधन
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व आपटे प्रशालेचे माजी मुख्याध्यापक व सचिव वि. मा. मिरासदार सर यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 91 व्या वर्षी रात्री 12.35 ला निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा 17 मार्च सकाळी 11 वाजता पंढरपूर येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघेल.
समजू नका की व्यर्थ त्याने
वार्धक्य हे आम्हा दिले
आहे असे "वरदान" काही
निवृत्त व्हायला दिले
असं पाटणकरांच्या ओळींप्रमाणे "वार्धक्य हे वरदान" असं समजून जगलेल्या वि. मा. मिरासदार सरांच वयाच्या 91 व्या वर्षी जाणं हे सुध्दा "अकाली" वाटून गेलं. का म्हणाल तर गेले काही महिनेच... वर्ष सुध्दा नाही .... सर सामाजिक कार्यक्रमात, त्यांच्य गप्पांच्या कंपनीत मिसळले नाहीत... नाहीतर वयाच्या नव्वदीपर्यंत सर उत्साहाने सर्वत्र सहभागी असायचे. आम्हा उभयतांप्रमाणे अनेकांवर त्यांचा अपार स्नेह होता.
आज वयाच्या 91 व्या वर्षीही "सर" अनेक संस्थेमध्ये मार्गदर्शक, कार्यवाह, उपाध्यक्ष अशी अनेक पदं नुसतीच भूषवत नसून त्या संस्थेमधील प्रत्येक उपक्रमात आमच्या आधी हजर असायचे. गाठ पडलेल्याला एखादं चॉकलेट... एखाद्याच्या विशेष कार्यक्रमात... कुणाला अत्तराची कुपी.... असं "गंध-रस" वाटत फिरणारा.... *वि. मा. सरांसारखा* .... "ज्येष्ठ नागरिक" पाहिला म्हणजे... प्रसन्न वाटायचं...!
"सर... कुठं सोडू ..? बसा की गाडीवर.."
असं म्हटल्यावर...
"नको अरे... हे काय चौकातच चाललोय...
जा तू तुझ्या कामाला.. मला सवय आहे चालायची.." ...
"बरं... कसे आहात...?
अजून काय म्हणताय... सर..?"
"काही नाही.. छान... मस्त... मजेत..."
हा बटनस्टार्ट गाडीवर बसता-उतरताना पाय दुखायची जाणीव होणाऱ्या माझ्या सारख्या पंचेचाळिशीतल्या आणि... 91 वर्षाच्या ..
"आदरणीय वि. मा. मिरासदार" सरांचा अन माझा नेहमीचा मुक्त संवाद...! शंभर मीटरवरचा चौक की दोन किलोमीटरवरचा चौक..? हे सरांनाच माहीत असायचं... पण स्वच्छ खादीचा हाफ बाहीचा शर्ट... पांढरीशुभ्र विजार... खांद्याला शबनम पिशवी... प्रसन्न चेहरा... जाणा-येणाऱ्याशी हसतमुख संवाद... आपुलकीनं चौकशी... अष्टावधानी दृष्टी... या बेजमेवर रस्त्यावरून जाताना नेहमी गाठ पडणारं, वृद्धापकाळातही तरुणपण जगलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे... वि. मा. सर...!
पंढरपूरच्या आपटे उपलप प्रशालेत मुख्याध्यापक म्हणून निवृत्त होऊन "सरांना" पंचवीस वर्षांपेक्षा जास्त वर्ष होऊन गेली असतील... मी त्या शाळेत नसल्यानं तसा काही शैक्षणिक कारणांनी त्यांचा सहवास कधी लाभला नाही पण.... आपल्या शाळेबरोबर इतरही शाळांमधील शिक्षक समोर आल्यावर मान खाली घालून जावं या काळात आम्ही शिक्षण घेतल्याचं भाग्य लाभल्यानं सरांची आदरयुक्त भीती वाटायची...!
वि. मा. सर तसं पाहिलं आजोबांच्या वयाचेच... त्यामुळं आजोबांचा म्हातारपणीचा मित्र त्यांचा नातू... या न्यायानं सध्या मार्गदर्शकाबरोबरच "सर" या भूमिकेतच सर्वांशी जास्त सलोखा साधून होते. त्यामुळं रोजच्या प्रभात कंपनीपासून... वयाचं... मानाचं... प्रतिष्ठेचं कोणतंही बंधन नसणाऱ्या सायंकाळच्या त्यांच्या उत्स्फूर्त... मिश्किल गप्पांच्या कंपनीपर्यंत सर्वाँना अनुपस्थिती जाणवून देणारं वि. मा. सर एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व होतं. "मिरासदारांची" .. "मिराषी" असणारा विनोद हा जाता-जाता चपखलपणे बसवावा तर त्यांनीच... ! कोणत्या प्रसंगी कोणता विनोद वापरावा याचं "शास्त्र" त्यांच्या सहवासात जास्त शिकता आलं. शेवटच्या भेटीत त्यांना विचारलं ... "सर आता कितव्या वयात पदार्पण...?" तेव्हा हसून म्हणाले... "मंदार...अरे आजच्या शिक्षकी भाषेत सांगायचं तर...आम्ही सगळे भाऊ-बहीण above 90 च्या टॅलेंट बॅचचे विद्यार्थी.. 91 लागेल आता..." आणि पुन्हा खळखळून हसले.
वयानं-मानानं लहान असला तरी त्याला सन्मान देणं, प्रोत्साहनाची पाठीवर थाप मारणं, प्रसंगी एखादी खंत खासगीत व्यक्त करण्याचं मोठेपण असणारी जी काही मोजकी मोठी माणसं आजवर भेटली त्यातील एक *वि. मा. सर* ..! काय आहे.... भरपूर आयुष्य काटेदार बाभळीला पण लाभतं.... अन वड-पिंपळालाही ..! पण किलबिलाट.. अन गर्द छाया वड-पिंपळाभोवतीच जास्त होते.
शिक्षकी पेशात अनेक वर्षे काढली असली तरी "सरांनी" समोरच्याच्या चुका लाल पेननी दाखवल्या नाहीत... तर पेन्सिल-रबर घेऊन त्या दाखवत त्यामुळं तिथल्या तिथं त्या दुरुस्ती करणं सोपं गेलं. ते उत्तम समीक्षक होते. कुणी काय वाचावं...? कुणाला काय योग्य... याची एक कार्यशाळा असणारे... शिस्तप्रिय.. घड्याळाच्या काट्यावर चालणारे वक्तशीर वि. मा. सर...! कोणत्याही कार्यक्रमास वेळेआधी हजर असत... अन आपल्या वेळेत निघूनही जात. अनेक वेळा हाशहुश करत त्यांच्या आधी कार्यक्रमाला पोहोचण्याचा प्रयत्न करायचो पण त्या आधीच.... एक हात कमरेवर ठेऊन घड्याळावर नजर टाकत... वर्गातल्या विद्यार्थ्याला न्याहाळल्यासारखे मिश्कीलपणे बघत... "सर" हजर असायचे. पूर्वीपासून रा. स्व. संघाचे स्वयंसेवक होते. त्यातील अनेक जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्यानं स्वयंशिस्त त्यांच्या रक्तातच होती. वि. मा. सर... उत्तम खवैय्या होते... पक्के पंढरपुरी होते....! मध्यंतरी जुन्या काळातील एका विषयावर मोजकी माहिती हवी होती म्हणून सरांना विचारलं तर... त्या माहितीबरोबरच अजून पाठीमागच्या काळातील अतिरिक्त माहिती दिली अन म्हणाले... "असू दे तुझ्या जवळ... पुन्हा मला आठवेल न आठवेल... ओघात आठवलं म्हणून सांगितलं .... तू वाया घालवणार नाहीस छान लिहितोस..." इतका सरांचा स्नेह होता. वयाच्या नव्वदीतही ग्रुप वर रोज एखादा सुविचार... कुणाला अभिनंदन, कुणाला शुभेच्छा... असं सोशल मिडियाचं नवीन तंत्रज्ञान अवगत असलेलं "वि. मा. सर नावाचं अपडेट" व्यक्तिमत्त्व होतं..!
जुनं पंढरपूर आणि बदलतं पंढरपूर यांना जोडणारे जे काही मोजके "पूल" राहिले होते त्यातला "वि. मा. सर" नावाचा कठडे शाबूत असणारा एक भरभक्कम अन वर्दळीचा पूल आज कोसळला....! त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन आणि त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना
पंढरपूर, मो. 9422380146
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा