परिसरातील अनेक शेती गटाने नोंदवला सहभाग
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी)
वैजापूर येथे दिनांक 22 जानेवारी 2025 रोजी, कृषी विभाग, आत्मा विभाग आणि ग्रीन प्लॅनेट यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा मेळावा जैविक शेतीचे महत्त्व आणि रासायनिक शेतीचे दुष्परिणाम याविषयी शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी होता.
विश्वक्रांती ऍग्रो सर्विसेसचे संतोष गुडदे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी अशोक आढाव हे अध्यक्ष होते. यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना जैविक शेतीबाबत मार्गदर्शन केले. रासायनिक शेतीचे दुष्परिणाम सांगत, त्यांनी नैसर्गिक शेतीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.
तसेच संतोष गुडदे यांनी शेतकऱ्यांना जैविक शेतीकडे वळण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी रासायनिक खते आणि फवारणीमुळे होणाऱ्या पर्यावरण नुकसानीवर चर्चा केली आणि सेंद्रिय शेतीचे फायदे स्पष्ट केले.
कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, पुणे येथील मृदा शास्त्रज्ञ, योगेश यादव यांनी नैसर्गिक शेतीतील सूक्ष्म जीव आणि पांढऱ्या मुळ्यांचे महत्त्व सांगितले. ग्रीन प्लॅनेटचे राष्ट्रीय प्रशिक्षक, प्रकाश मगर यांनी तरुण पिढीला जैविक शेतीत करिअर करण्याचे आवाहन केले. यावेळी ग्रीन प्लॅनेटने शेतकऱ्यांसाठी "जमीन वाचवा अभियान" सुरू केले.
उपस्थित शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी या कार्यक्रमात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सुरेखा पोटे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर आत्मासंचालक प्रसाद शिंदे आणि के.के. गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. संत सावता शेतकरी गट, कृषी संजीवनी गट, महात्मा फुले शेतकरी गट, आदर्श शेतकरी गट, साई शेतकरी गट या गटांचे सदस्य व प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा