मनसे नेते तथा पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे उमेदवार दिलीप धोत्रे यानी साधला संवाद
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (शहर प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर शहर तालुक्याच्या विकासासाठी गेली अनेक वर्ष योगदान देणाऱ्या इंजिनीयर, आर्किटेक्ट, बिल्डर्स यांचा गौरव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू यांच्या हस्ते पंढरपूर शहरातील चतुर्थी हॉल येथे करण्यात आला .
संसाराची सुरुवात होते तेव्हा स्वप्न घराचे अंकुरते मनात. या वाक्याप्रमाणे पंढरपूर शहर व तालुक्यात गेली अनेक वर्षांपासून अविरतपणे बांधकाम क्षेत्रात सेवा कार्य बजावून गरीब,मध्यम,श्रीमंत लोकांच्या घराचे, व्यावसायिक बांधकामाचे स्वप्न साकार करीत असलेल्या इंजिनियर, आर्किटेक्चर, बिल्डर यांनी अनेक लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण आणून हजारो कुटुंब आनंदी केले आहेत. अशा पंढरपूर येथील सर्व बांधकाम क्षेत्रातील इंजिनियर, आर्किटेक्चर, बिल्डर बंधूंचा सहकुटुंब गौरव व सन्मान सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी आर्किटेक्ट अर.बी.जाधव, क्रेडाईचे अध्यक्ष अमित शिरगावकर, सचिव मिलिंद वाघ, इंजिनीयर असोसिएशनचे अध्यक्ष सारंग कोळी, अध्यक्ष शरद कुलकर्णी, कांतीलाल डुबल, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत बागल, मनसे विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, ऍड. संदीप रननवरे, ऍड पराग जहागीर, सुहास शिर्के, संघटक गणेश पिंपळनेरकर, अनिल सप्ताळ इत्यादी उपस्थित होते.
याप्रसंगी मनसे नेते दिलीपबापू धोत्रे यांनी बांधकाम क्षेत्रातील बंधूंशी संवाद साधताना बांधकाम क्षेत्रात काम करताना आलेले अनुभव सांगताना अनेक किस्से सांगितले आणि शालेय जीवनापासून आतापर्यंतच्या राजकीय प्रवासाला उजाळा देत मनसेच्या वतीने पंढरपूर शहरात करण्यात आलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली.
यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यामार्फत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पंढरपुरातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे लवकरच पंढरपुरात एमआयडीसी उभारण्यात येईल असा विश्वास दिला.
यानंतर पंढरपूर येथील सर्व इंजिनीयर,आर्किटेक्चर,बिल्डर, क्रीडाईचे अध्यक्ष, पदाधिकारी आणि बांधकाम क्षेत्रात काम करत असणाऱ्या सर्व मंडळींचा फेटा बांधून, भगवी शाल, पैठणी व पुष्पहार घालून व मनसे गौरवचिन्ह देऊन सपत्नीक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि क्रेडाई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी पंढरपूर येथील लिंक रोड वरील हॉटेल चतुर्थी हॉल येथे करण्यात आले होते.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा