देवाचे पुरातन अलंकार मूल्यांकन करणे कामी शासनमान्य मूल्यांकनकाराची नियुक्ती
आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे बाबत शासनास प्रस्ताव सादर
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (ता.20)
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिराचे जतन व संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली शासन निधीतून सुरू आहे. पुरातत्त्व विभाग व संबधित कंत्राटदारानी सदर कामास गती देऊन वेळेत व गुणवत्तापूर्ण करवीत अशा सूचना मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिल्या. तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे पुरातन अलंकार मूल्यांकन करणे कामी शासन नियुक्त मूल्यांकनकाराची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची मासिक सभा आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास येथे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीचे सदस्य शकुंतला नडगिरे, डॉ. दिनेशकुमार कदम, भास्करगिरी महाराज, संभाजी शिंदे, ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, अँड माधवी निगडे, ह.भ.प.श्री. प्रकाश जवंजाळ, भागवतभूषण अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प.श्री. शिवाजीराव मोरे, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, वास्तुविशारद तेजस्विनी आफळे तसेच सर्व विभागाचे खाते प्रमुख उपस्थित होते.
या सभेत मंदिर संवर्धन व जतन कामाबाबत सुरू असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे बाबत शासनास प्रस्ताव सादर करणे, आस्थापनेवर कर्मचाऱ्यांना धर्मादाय आयुक्त यांनी मंजुरी दिल्यानुसार अनुकंपा नियमावली लागू करणे, मंदिर समितीकडे फौजदारी दाव्यांचे न्यायालयातील कामकाज पाहण्यासाठी शासनामार्फत स्वतंत्र सरकारी वकिलाची नेमणूक करण्याबाबत शासनास प्रस्ताव सादर करणे, पंढरपूर येथे वारकरी संप्रदाय आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र स्थापन करणे बाबत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व मंदिर समितीची संयुक्त बैठक आयोजित करणे, श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ अलंकार मूल्यांकन करणेकामी पुरुषोत्तम काळे, विष्णू सखाराम ज्वेलर्स मुंबई या शासनमान्य मूल्यांकनकाराची नियुक्ती करणे इत्यादी ठराव पारित करण्यात आले. तसेच विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव देखील करण्यात आला.
त्याचबरोबर, दर्शन व्यवस्था, पूजा बुकिंग व्यवस्था, मोबाईल लॉकर पावती इत्यादीसाठी संगणक प्रणाली विकसित करणे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सखोल माहितीची लघु चित्रफीत (डॉक्युमेंटरी) तयार करणे, देणगी देणाऱ्या भाविकांचा येथोचित सन्मान करून श्रींचा प्रसाद देणे, सन 2025 साठी दैनंदिनी व दिनदर्शिका छापाई करणे इत्यादी निर्णय घेण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
यावेळी मंदिर समितीचे माजी व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड तसेच नवनियुक्त व्यवस्थापक तथा नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांचा मंदिर समितीचे सह अध्यक्ष व सन्माननीय सर्व सदस्य महोदयांच्या हस्ते श्रींची मूर्ती व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा