महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार संवाद यात्रेचे शिर्डी येथे जोरदार स्वागत
शिवशाही वृत्तसेवा, पारनेर (प्रतिनिधी सुदाम दरेकर)
समाजाच्या प्रश्नांसाठी समाज व्यवस्थेशी झगडत राहितो व आपल्या स्वतःच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो, म्हणून आता न्याय मागण्यां साठी महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना एकत्र करून त्यांचा आवाज महाराष्ट्र सरकार पोहोचविण्याचा प्रयत्न या पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून सुरू असून सरकारने ही पत्रकारांच्या प्रश्नावर संवेदनशील होऊन पत्रकारांना न्याय द्यावा, पत्रकारांकडेही लेखणीसोबतच मतांची देखील ताकद आहे. एका मतदारसंघात संघात वीस पत्रकारांनी व्यक्तीगत पातळीवर प्रत्येकी ५oo मते जरी एकत्र केली, तर राज्यात ३० लाख मतांचा एक मोठा गठ्ठा होईल. त्यामुळे सरकारने ही पत्रकारांच्या मतांची गरज आहे की नाही? असा प्रश्न करत सरकारने पत्रकारांच्या मागण्यांसाठी गांभिर्याने विचार करावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी केले .
दि २८ जुलै २०२४ रोजी नागपूर च्या दिक्षाभूमी ते मुंबई मंत्रालयापर्यंत पत्रकार संवाद यात्रेनिमित्त राज्यात साई नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिर्डी येथे अहिल्या नगर जिल्हयातील पत्रकारांचा मेळावा संपन्न झाला. विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, तर खान्देशातील धुळे, जळगाव, शेगाव या मार्गे श्रीक्षेत्र शिर्डी येथे शुक्रवार दि . २ रोजी ही संवाद यात्रा दाखल झाली. यावेळी जिल्हयातील पत्रकारांच्या उपस्थित जेसीबी तून फुलांची उधळण व वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिष बाजीत प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे , प्रदेश सचिव डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, मुंबई विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे , अहिल्यानगर दक्षिण जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील, निवड समितीचे अध्यक्ष फायक अली सय्यद, प्रसिद्ध प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे , उत्तर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, उत्तर विभागीय सचिव अनिल रहाणे, राज्य संपादक व पत्रकार सेवा संघाचे अध्यक्ष किसन हासे , ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकार तथा सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र सुपेकर, मुकुंदराव निघोजकर, पारनेर तालुका अध्यक्ष संतोष तांबे, उपाध्यक्ष वसंतराव रांधवण, सचिव संतोष कोरडे, सहसचिव ॲड. सोमनाथ गोपाळे, कार्यकारिणी सदस्य दिपकराव वरखडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबईचे संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ हासे व शिर्डी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या संवाद यात्रेला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.
या प्रसंग प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे पुढे म्हणाले की, साई बाबांनी श्रद्धा आणि सबुरीची शिकवण जगाला दिली. अशा संत नगरी असलेल्या शिर्डीत या यात्रेचे मोठ्या उत्सफुर्त पणे स्वागत झाल्याबद्दल धन्यवाद मानले व ज्यावेळी नागपूरच्या दिक्षाभूमी येथून संवाद यात्रेला प्रारंभ झाला. त्यावेळी मला मनात थोडी साशंकता होती. मात्र जसा संवाद यात्रेचा प्रवास सुरू झाला, तसा पुढे वर्धा, अमरावती, अकोला, शेगाव, जळगाव, धुळे ते आज शिर्डी या प्रवासा दरम्यान विविध भागांमध्ये व विविध ठिकाणी पत्रकारांच्या वेगवेगळ्या संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, सामान्य जनता यांनी संवाद यात्रेचे स्वतः हून मोठ्या मनाने स्वागत करत जाहीर पाठिंबा दिला. या भागातून प्रवास करत असताना पत्रकारांनी त्यांच्या वास्तव समस्या जेव्हा समोर मांडल्या, तेव्हा मी केवळ २० प्रमुख समस्यांना सोबत घेऊन निघालो होतो. पण त्यात आता मोठ्या प्रमाणावर भर पडत आहे. या मागण्यांमध्ये मुंबई येथील मंत्रालया पर्यंत पोहचे पर्यंत किती वाढ होईल, हे आज सांगू शकत नाही. याचाच अर्थ पत्रकारांच्या समस्या होत्या आणि आहेत. केवळ या समस्यांवर आवाज कोणी काढायचा? समाजाचे प्रश्न मांडणाऱ्या पत्रकारांना आपलेच प्रश्न कुणापुढे मांडावेत? हा प्रश्न पडला होता. हे वास्तव या संवाद यात्रेच्या माध्यमातून समोर येत आहे.
आज पर्यंत लोकशाहीच्या संविधानिक मार्गाने आम्ही सरकारकडे न्याय व हक्काच्या मागण्या मागितल्या. यातील काही मागण्यांना सरकारने न्याय दिला. मात्र त्यामध्ये जाचक अटी टाकल्या. यामुळे त्या सुविधांचा लाभ सुलभपणे होत नाही. आता आमची मागणी एवढीच आहे की, पत्रकारांना अधिस्वीकृती सहज मिळावी आणि ज्येष्ठ पत्रकारांना वयाच्या ६० व्या वर्षी तात्काळ शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे सन्मान पेन्शन योजना मिळावी. या आणि विविध न्याय मागण्यांना सरकारने मंगळवार दि. २० ऑगस्ट रोजी पत्रकार संवाद यात्रेच्या समारोप कार्यक्रमाच्या व्यासपीठावर येऊन पत्रकार देखील लाडकी बहीण, लाडका भाऊ याप्रमाणे लाडका पत्रकार देखील आहे, हे सिद्ध करून पत्रकारांच्या हिताचे निर्णय शासन स्तरावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी जाहीर करावेत. पत्रकारांकडे लेखणी बरोबरच मतांचीही शक्ती आहे, याचा ही विचार करावा. यामध्ये आम्हाला कसलेही राजकारण करायचे नाही. तो आमचा पिंड ही नाही. आम्ही आमच्या न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी प्रामाणिकपणे सरकारशी लढत राहू , एवढीच आमची या संवाद यात्रे मागील प्रमुख भूमिका आहे. असे स्पष्टीकरण ही प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी दिले.
यावेळी पत्रकार संघाचे अभ्यासू प्रदेश सरचिटणीस डॉ . विश्वासराव आरोटे यांनी ही संवाद यात्रा वंचित पीडित अन्यायग्रस्त पत्रकारांचा आवाज बुलंद करण्यासाठी असून राज्यभरातील पत्रकारांच्या प्रश्नांना उजाळा देत, जागर करत निघालेली आहे. सुदैवाने या महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री हे संपादक लाभले. यात प्रामुख्याने दैनिक सामनाचे संपादक उद्धवराव ठाकरे हे या आधी अडीच वर्षे मुख्यमंत्री होते , तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे देखील संपादक असल्याने ते पत्रकारांच्या प्रश्नांना या संवाद यात्रेच्या माध्यमातून नक्कीच न्याय देतील. असा विश्वास व्यक्त करून प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्याकडे नेतृत्व, दातृत्व आणि कर्तुत्व असल्याने त्यांच्या नेतृत्वा खाली महाराष्ट्रातील पत्रकारांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. व ही संवाद यात्रा सर्व पत्रकारांची आहे , कोणत्याही एक संघटनेची नाही .
राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे म्हणाले की , पत्रकारांच्या प्रश्नांची जाण असलेले आपले लाडके नेतृत्व वसंतराव मुंडे यांच्या रूपाने पत्रकारांना लाभले आहे. पत्रकारांना देखील प्रश्न असतात आणि ते सोडवावे लागतात ही भूमिका आता पत्रकारांसह जनसामान्यांना देखील मान्य झाली आहे. हेच संवाद यात्रेचे पहिले यश आहे. त्यामुळे आता ही यात्रा कुठेही थांबणार नाही. पत्रकारांना न्याय हक्क मिळवून दिल्यावरच हा संघर्ष थांबेल असे जाहीर केले. व्यासपीठावरील विविध मान्यवरांनी आपले मत व्यक्त केले.
मान्यवरांचे स्वागत उत्तर विभागीय सचिव अनिल रहाणे यांनी केले. आभार प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले. पत्रकार संवाद यात्रेतील पहिल्या टप्प्याच्या समारोपात राज्यभरातील पत्रकार आणि पत्रकार प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार व सेवानिवृत्त प्राचार्य हभप रामचंद्र सुपेकर सर यांच्या सुश्राव्य वाणीतून पसायदानाने या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने शोभा आली. सुग्रास मिष्ठान्नाने कार्यक्रमाची सांगता झाली.
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा