खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी बी बियाणे खते पीक व्यवस्थापन रोग व्यवस्थापन अत्याधुनिक तंत्रज्ञान इत्यादी विषयी मार्गदर्शन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत तालुका कृषि अधिकारी कार्यालय, वाई येथे बसवराज बिराजदार, विभागीय कृषि सहसंचालक, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
अध्यक्ष स्थानावरुन बोलताना बसवराज बिराजदार विभागीय कृषि सहसंचालक कोल्हापूर यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेचा लाभ घ्यावा, तसेच विविध पिकांविषयी अद्यावत माहिती असली पाहिजे असे सांगितले. तसेच विविध योजनांचा आढावा घेतला. तालुक्यात अधिक उद्योजक निर्माण व्हावेत असे शेतक-यांना नाविन्यपूर्ण बाबींचे मार्गदर्शन करावे अशा सूचना देवून खरीप हंगाम यशस्वीतेच्या शुभेच्छा दिल्या.
भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, सांतारा यांनी खरीप हंगाम २०२४-२५ साठी खरीप ज्वारी, भात, भुईमुग, सोयाबीन, घेवडा, मका, उडीद, मुग, तुर, वाटाणा या पिकांसाठी महाबीजकडे १७९५ क्विंटल व इतर खाजगी कंपन्यांचे २७१५ क्विंटल असे एकूण ४५१० क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. तसेच खरीप हंगामाच्या यशस्वीतेसाठी एप्रिल २०२४ ते सप्टेंबर २०२४ या दरम्यान विविध प्रकारची ६४४३ मे. टन खते उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. क्षेत्रीय स्तरावर खत बचत नियोजनासाठी सर्व गावांमध्ये सुपिकता निर्देशांक फलक लावण्यात यावेत. पिकनिहाय गरजेनुसार खते देण्यासाठी फार्म कॅलक्युलेटरचा वापर, सेंद्रिय खते, जिवाणू खते यांचा वापर वाढविणे, शेतकऱ्यांना उत्तम गुणवत्तेच्या निविष्ठा मिळाव्यात व खरीप हंगामात निविष्ठा पुरवठा व गुण नियंत्रण संदर्भात भरारी पथकाची स्थापना करणे व कमी गुणत्तेच्या कृषि निविष्ठा विक्री करणारे विक्रेते व उत्पादक यांच्यावर योग्य ती
कारवाई करणे यासाठी तालुका कृषि अधिकारी वाई येथे तक्रार निवारण समिती स्थापन करावी असे सांगितले.
खरीप हंगाम यशस्वीतेसाठी विविध मोहीमांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सुपरकेन नर्सरी, सोयाबीन उगवण क्षमता चाचणी, महाडीबीटी प्रचार प्रसिद्धी, माती परिक्षण व खत बचत मोहीम, हुमणी नियंत्रण मोहीम, बिज प्रक्रिया मोहीम, बांधावर खते व बियाणे वाटप, रुंद सरी, वरंभा पद्धत, पिक विमा, अपघात विमा प्रचार व प्रसिद्धी असे उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले. व सर्व कृषि सहाय्यक यांना ग्राम कृषि विकास समिती स्थापन करण्याच्या सुचना दिल्या. ग्राम कृषि विस्तार आराखडे तयार करणेस सांगितले भुषण यादगिरवार, विषय विशेषज्ञ, के. व्ही. के. बोरगांव यांनी सोयाबीन, हळद, आले, सोयाबीन, भात या पिकांचे पुर्व मशागत, बियाणे निवड, लागवड पद्धत, एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन व महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी मार्फत देण्यात आलेल्या विविध शिफारसी बाबत सखोल मार्गदर्शन केले.
आढावा सभेमध्ये प्रशांत शेंडे, तालुका कृषि अधिकारी, वाई यांनी सन २०२३-२४ मध्ये तालुक्यात राबविलेल्या योजनांचे सादरीकरण केले. सन २०२४-२५ मध्ये तालुक्यामध्ये राबविण्यात येणारे विविध बाबींचे नियोजन सादर केले. तसेच मंडळ कृषि अधिकारी यांनी सन २०२३ २४ मध्ये आपल्या मंडळ राबविलेल्या योजनांचे सादरीकरण केले. सन २०२४-२५ मध्ये मंडळमध्ये राबविण्यात येणारे विविध बाबींचे नियोजन सादर केले.
सदर आढावा सभा व प्रशिक्षण कार्यक्रमास मंडळ कृषि अधिकारी कार्यालय वाई कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व आत्मा बी.टी.एम. व ए.टी.एम. तसेच जिल्हा संसाधन व्यक्ती पी.एम. एफ.एम.ई योजना हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रदीप देवरे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी शेंडगे कृषि अधिकारी ता.कृ.अ. कार्यालय वाई यांनी केले.
----------------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा